दलित आंदोलनाचा भडका… गोळीबार, लाठीमार ९ जणांचा मृत्यू

सामना ऑनलाईन । भोपाळ/लखनौ/चंदिगड

आजच्या बंदचा महाराष्ट्रात परिणाम झाला नाही. मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगरसह सर्वत्र जनजीवन सुरळीत होते. नंदुरबार येथे चार बसेसची तोडफोड झाली. नागपुरात शहर वाहतुकीची बस जाळण्यात आली.

‘ऍट्रॉसिटी’ कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात दलित संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदचा भडका आज अनेक राज्यांमध्ये उडाला. बंदचा सर्वाधिक परिणाम उत्तर हिंदुस्थानातील राज्यांमध्ये झाला. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाबसह 10 राज्यांमध्ये हिंसाचार भडकला. यात किमान नऊजणांचा मृत्यू झाला असून, शेकडोजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहाजण मध्य प्रदेशातील, राजस्थानात एक आणि उत्तर प्रदेशातील एकाचा समावेश आहे. बिहारातही एका नवजात बालकाचाही मृत्यू झाला. पोलिसांना लाठीहल्ला करीत अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडाव्या लागल्या. संतप्त जमावाला आटोक्यात आणण्यासाठी गोळीबार केला. अनेक शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, रेल रोको, रास्ता रोकोमुळे जनजीवन विस्कळीत झाले. पंजाबमध्ये ‘सीबीएसई’ 10वी आणि 12वीचा आजचा पेपर पुढे ढकलला. बंदकाळात अफवा रोखण्यासाठी मोबाईल-इंटरनेट सेवा बंद करण्यात आली.

पंजाबमध्ये ‘सीबीएसई’चे पेपर पुढे ढकलले

पंजाबमध्ये ‘सीबीएसई’ 12वी आणि 10वीचा सोमवारचा पेपर पुढे ढकलण्यात आला.

राज्यात अनेक ठिकाणी रेल्वो रोको करण्यात आले. पोलिसांनी लाठीमार केला. खबरदारीचा उपाय म्हणून इंटनेट सेवा बंद करण्यात आली.

दिल्ली, हरयाणातही पडसाद उमटले

राजधानी दिल्लीत सर्व रेल्वेस्थानकांवर हायऍलर्ट जारी करण्यात आला होता, मात्र आंदोलकांनी देहरादून एक्सप्रेस, रांची राजधानी एक्प्रेससह अनेक रेल्वे रोखल्या. गाझियाबाद येथे जोरदार आंदोलन केले.

दिल्लीत मंडी हाऊस येथे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रास्ता रोकोही करण्यात आले.

अंबाला, रोहतक, चंदिगडमध्ये बंदचा मोठा परिणाम झाला.

हरयाणात कैथल येथे एसटी डेपोत घुसून तिकीट काऊंटर फोडले. रेल्वे स्थानकातील इंजिनाची तोडफोड करण्यात आली. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 10 जण जखमी झाले. दगडफेकीत 50 पोलीस जखमी झाले.

हापूर रेल्वेस्टेशनवर दोन हजारांच्या जमावाने आंदोलन केले. मालवाहतुकीवर परिणाम झाला.
रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम

बंदचे सर्वाधिक पडसाद उत्तर हिंदुस्थानात उमटले. याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला.

100 वर रेल्वे बंद करण्यात आल्या तर काही रेल्वे गाडय़ांचे मार्ग बदलण्यात आले. त्यामुळे राजधानी दिल्लीसह उत्तर हिंदुस्थानातील अनेक स्टेशनवर प्रवाशांना अडकून पडावे लागले.

गुजरातमध्ये तणाव; दगडफेक

गुजरातमध्ये राज्य परिवहन मंडळाच्या बसेसची तोडफोड करण्यात आली. जामनगर, राजकोट, अहमदाबाद, सुरतसह सर्व शहरांतील जनजीवन विस्कळीत झाले.

कच्छ जिह्यात सरकारी वाहनांची तोडफोड करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी भावनगर जिह्यात घोडय़ावर बसला म्हणून एका दलित तरुणाची हत्या करण्यात आली होती.

बिहारात नवजात बालकाचा मृत्यू

मधुबनी, आरा, भागलपूर, अररियात रेल्वो रोको करण्यात आला. अनेक ठिकाणी तोडफोड करण्यात आली.

वैशाली येथे जमावाने रास्ता रोको केला त्यात एक ऍम्ब्युलन्स अडकली. ट्रफिक जाममध्ये अडकून पडल्यामुळे ऍम्ब्युलन्समधील एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

छत्तीसगड, ओडिशातही बंदमुळे जनजीवन ठप्प झाले. अनेक ठिकाणी तोडफोडी, दगडफेकीच्या घटना घडल्या.

झारखंडमध्ये बाजारपेठा बंद करण्यात आल्या. रेल्वे रोको केले. रांची येथे पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. जमशेदपूर येथे एक ट्रक पेटविला.

हिंदुस्थान बंदमुळे झालेल्या हिंसाचाराला सुप्रीम कोर्ट आणि सरकारच जबाबदार

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यातील (ऍट्रॉसिटी ऍक्ट) फेरबदलाविरोधात दलित-आदिकासी संघटनांनी पुकारलेल्या बंदमुळे देशात झालेल्या हिंसाचाराला सर्वस्वी सुप्रीम कोर्ट आणि सरकार जबाबदार आहे असा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. ऍट्रॉसिटीबाबत सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाशी विसंगत निर्णय दिला आहे. आधीच राज्यघटनेत बदल, आरक्षण संपविण्याची चर्चा भाजप नेत्यांकडून केली जात असल्याने अस्वस्थता काढत असून आता सर्वोच्च न्यायालयाच्या विसंगत निर्णयामुळे त्यात भर पडत असल्याचेही त्यांनी नमूद केले. हिंदुस्थान बंदच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

…तर हिंदुस्थानचा सीरिया होईल

देशातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालली आहे. सर्वजण आपापल्या जातींचे नेते झाले आहेत. संभाजी भिडे – मिलिंद एकबोटे यांना सरकार पाठीशी घालत असून त्यांच्याकर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थतेची भावना वाढत आहे. भविष्यात हिंदुस्थानचा सीरिया व्हायला वेळ लागणार नाही, असेही आंबेडकर यांनी सांगितले.

डहाणूत कडकडीत बंद

ऍट्रॉसिटी कायदा शिथिल करून मूळ कायद्याची ताकद नष्ट करण्याच्या आदेशाला तीव्र किरोध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या हिंदुस्थान बंदला डहाणूत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आदिवासी एकता परिषद, भूमिसेना व समविचारी संघटनांनी बंदची हाक दिली होती. डहाणूतील जनतेने बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून सरकारविरोधात आपला निषेध नोंदवला. बंददरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

पालघरमध्ये बाजारपेठा ओस

ऍट्रॉसिटी कायदा शिथिल केल्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला पालघर तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. पालघरमधील दुकाने, भाजी मार्केट, 3 आसनी व सहा आसनी रिक्षा बंद होत्या. रिक्षाअभावी पालघर स्टेशनकर उतरणाऱया प्रकाशांचे हाल झाले. बस सुरू होत्या पण ती सेवा तुरळक प्रमाणात चालू होती. परीक्षेचा हंगाम असल्याने विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागला. पालघर तालुक्यातील मनोर, नागझरी, बोईसर या ठिकाणी पण बंद पाळण्यात आला.

हिंदुस्थान बंदला नागपुरात हिंसक वळण

ऍट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात, दलित संघटनांनी आज हिंदुस्थान बंदची हाक दिली होती. या बंददरम्यान नागपूरमध्ये बंदला हिंसक वळण लागले. दलित कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी बसवर दगडफेक करून नुकसान केले तर एका बसला आग लावली. गड्डीगोदाम चौकात गुरुद्वाराजवळ मालगाडी रोखून मालगाडी वाहन चालकाला मारहाण केल्याची घटना घडली.

मध्य प्रदेशात लष्कराला पाचारण; संचारबंदी

मध्य प्रदेशात ग्वाल्हेर येथे आंदोलनाचा मोठा भडका उडाला. पोलिसांनी लाठीमार केला. गोळीबाराच्या घटना घडल्या. दोन गटांनी आपापसात गोळीबार केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ग्वाल्हेरमध्ये हिंसाचारात दोनजणांचा मृत्यू झाला तर मुरैना येथे विद्यार्थी नेता राहुल पाठकचा मृत्यू झाला. भिंड जिह्यातही दोनजण ठार झाले आहेत.

ग्वाल्हेर, भिंड आणि मुरैना या तीन जिह्यांत संचारबंदी लागू करण्यात आली असून लष्कराला तैनात केले आहे. हिंसक जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. जाळपोळीचे लोण राज्यभर पसरण्याची भीती आहे.

उत्तर प्रदेशात जाळपोळ; पोलिसांचा गोळीबार

उत्तर प्रदेशात मोठय़ा प्रमाणावर दलित संघटना रस्त्यावर उतरल्या. मेरठ, गोरखपूर, सहारनपूर, मुझफ्फरनगर, मथुरा, आग्रा, हापूर, बिजनौरसह अनेक जिह्यांमध्ये आंदोलन सुरू आहे.

उत्तर प्रदेशात बंदमुळे जनजीवन विस्कळीत झाले. रास्ता रोको, रेल्वे रोको करण्यात आले. दुकानांची तोडफोड केली. एका पोलीस स्टेशनसह अनेक वाहने पेटविण्यात आली.

मुझफ्फरनगर येथे हिंसाचारात एका नागरिकाचा मृत्यू झाला. 40 पोलीस आणि 27 नागरिक जखमी झाले.

राजस्थानात जाळपोळ; एकाचा मृत्यू

राजस्थानात देशव्यापी बंदचा भडका उडाला. बाडमेरमध्ये चार कार पेटविल्या. पुष्कर येथे वाहनांची तोडफोड केली. भरतपूर, दाऊदापूर येथे आंदोलन पेटले. पोलिसांनी लाठीमार केला.

अनेक ठिकाणी जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद करण्यात आली आहे. या हिंसाचारात एकजण ठार झाला आहे.