चिमणबागेतील फटाके!

जर्मनी जर्मनांचा, ब्रिटन ब्रिटिशांचा, अमेरिका अमेरिकनांची, त्याचप्रमाणे हिंदुस्थान हा हिंदूंचा देश आहे. याचा अर्थ तो इतर धर्मीयांचा देश नाही असा होत नाही. हिंदुस्थानी संस्कृतीचे पालन करणारे हिंदुस्थानी पूर्वजांचे वंशज हे भारतमातेचे पुत्र असून ते सर्व हिंदूच आहेत, असे सरसंघचालकांनी सांगितले. इंदूरच्या चिमणबागेतील त्यांचे हे चिंतन मंथन आहे, पण चिमणबागेत सरसंघचालकांनी शेवटी जो फटाका फोडला आहे तो कानठळय़ा वाजवणारा नसला तरी दुर्लक्षित करण्यासारखा नाही. ते सांगतात, ‘‘कोणीही एकटा नेता किंवा पक्ष देशाला महान बनवू शकत नाही. प्राचीन युगात विकासासाठी लोक देवाचा धावा करीत असत, कलियुगात लोक त्यासाठी सरकारकडे पाहतात.’’ सरसंघचालकांनी सत्य सांगितले आहे, पण सत्य आणि स्वप्न प्रत्यक्षात जमिनीवर उतरताना दिसत आहे काय?

सरसंघचालक मोहन भागवत यांनी असे सांगितले आहे की, हिंदुस्थान हिंदूंचा तसा इतरांचाही आहे. विचार नवा नाही, जुनाच आहे. शिवसेनाप्रमुखांनी हाच विचार यापेक्षा प्रखर व जहाल भाषेत सतत मांडला आहे. धर्माच्या नावावर मुसलमानांसाठी पाकिस्तान निर्माण झाले. त्यामुळे आता हे फक्त हिंदू राष्ट्रच आहे. हिंदू राष्ट्रात इतर धर्माचे लोक हिंदुस्थानचे नागरिक म्हणून राहू शकतात, पण त्यांनी आपापले धर्म सांभाळून हिंदू राष्ट्रावर निष्ठा ठेवायला हवी. ज्यांना हे मान्य नाही त्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे. हिंदुस्थानात वीस-बावीस कोटी मुसलमान आहेत व त्यांनी कुठे जावे आणि काय करावे? असा प्रश्न बेगडी निधर्मीवादी नेहमीच विचारीत असतात. त्यांनाही शिवसेनाप्रमुखांनी ठणकावून सांगितले आहे, लोकसंख्येच्या बळावर व्होट बँकेची मस्ती आम्हाला दाखवू नका. येथे तुम्ही देशाचे नागरिक म्हणून राहणार असाल तर तुमचे स्वागत आहे. भांडण तुमच्या धर्माशी नसून वृत्तीशी आहे. इथे राहायचे आणि पाकिस्तानचे गोडवे गायचे. म्यानमारमध्ये मुसलमानांच्या बाबतीत काही वाजले की, लखनौपासून मुंबईपर्यंत लुंग्या वर करून थयथया नाचायचे. सलमान रश्दीने इस्लाम धर्मातील अंधश्रद्धांवर काही लिहिले की, इकडे दंगली घडवायच्या. हिंदुस्थानची राज्यघटना पाळायची नाही व सतत फुटून निघण्याच्या धमक्या द्यायच्या. हे

चाळे बंद करणार असाल तर

तुमचे स्वागत आहे. अन्यथा तुम्हाला तुमचा रस्ता मोकळा आहे. ‘वंदे मातरम्’ही म्हणावेच लागेल असे खणखणीतपणे बजावणारे एकमेव शिवसेनाप्रमुखच होते. भागवतांच्या विधानाचे म्हणूनच आम्ही स्वागत करतो. सरसंघचालक म्हणतात, ‘‘हिंदुस्थान हिंदूंचा तसा इतरांचाही.’’ शिवसेनाप्रमुख म्हणत, ‘‘हिंदुस्थान आधी हिंदूंचा मग इतरांचा.’’ कारण या जगात मुसलमानांसाठी पन्नासच्या वर राष्ट्रे आहेत, ख्रिश्चनांसाठी अमेरिका, युरोपसह अनेक राष्ट्रे आहेत तर बौद्धांसाठी चीन, जपान, श्रीलंका, म्यानमारसारखे देश असताना जगाच्या पाठीवर हिंदूंसाठी एकही राष्ट्र नसावे ही शोकांतिका आहे. म्हणूनच हे हिंदू राष्ट्र व्हायलाच हवे, पण हिंदुस्थान हिंदूंच्या मालकीचा आहे असे म्हणायचे म्हणजे निधर्मीवाद्यांच्या वारुळात दगड मारण्यासारखे आहे. आजचे येथील मुसलमान हे कधीकाळी हिंदूच होते. तसा आजचा बौद्ध समाजही हिंदूच होता. हिंदू समाज हा जाती-पंथानुसार फाटला आहे व हीच फाटाफूट धोकादायक आहे. हिंदुस्थानात आज संपूर्ण बहुमताचे हिंदुत्ववाद्यांचे राज्य आले आहे व बहुमताच्या जोरावर ‘हिंदू राष्ट्र’ बनवायला काहीच हरकत नाही, पण आजही अयोध्येत राममंदिराची पायाभरणी करायला सरकार तयार नाही व न्यायालयाच्या भरवशावर राममंदिराचे भविष्य आहे. हिंदुत्ववाद्यांचे सरकार दिल्लीत येऊनही कश्मिरी पंडितांची घरवापसी झाली नाही याचे दुःख सरसंघचालकांनाही असेलच.

हिंदुत्ववाद्यांचे संघ विचारांचे

पंतप्रधान आणि राष्ट्रपती विराजमान असतानाही ‘वंदे मातरम्’च्या बाबतीत अडेलतट्टू भूमिका घेणाऱयांना धाक वाटत नाही व राष्ट्रगीताला उभे राहून मान द्यावा असे वाटत नाही अशांचे काय करावे? हिंदुस्थान ज्या इतरांचा आहे ते सर्व ‘इतर’ राष्ट्रगीताचा अपमान करणार असतील तर हिंदुत्ववादी सरकारची भूमिका काय असावी याचेही मार्गदर्शन सरसंघचालकांकडून अपेक्षित आहे. जर्मनी जर्मनांचा, ब्रिटन ब्रिटिशांचा, अमेरिका अमेरिकनांची, त्याचप्रमाणे हिंदुस्थान हा हिंदूंचा देश आहे. याचा अर्थ तो इतर धर्मीयांचा देश नाही असा होत नाही. हिंदुस्थानी संस्कृतीचे पालन करणारे हिंदुस्थानी पूर्वजांचे वंशज हे भारतमातेचे पुत्र असून ते सर्व हिंदूच आहेत, असे सरसंघचालकांनी सांगितले. इंदूरच्या चिमणबागेतील त्यांचे हे चिंतन व मंथन आहे, पण चिमणबागेत सरसंघचालकांनी शेवटी जो फटाका फोडला आहे तो कानठळय़ा वाजवणारा नसला तरी दुर्लक्षित करण्यासारखा नाही. ते सांगतात, ‘‘कोणीही एकटा नेता किंवा पक्ष देशाला महान बनवू शकत नाही. प्राचीन युगात विकासासाठी लोक देवाचा धावा करीत असत, कलियुगात लोक त्यासाठी सरकारकडे पाहतात.’’ सरसंघचालकांनी सत्य सांगितले आहे, पण सत्य आणि स्वप्न प्रत्यक्षात जमिनीवर उतरताना दिसत आहे काय? प्रभू श्रीराम व लाखो कश्मिरी पंडितही सरकारकडेच डोळे लावून बसले आहेत.