हिंसाचारामागे हिंदुत्ववादी संघटना?

सामना ऑनलाईन । मुंबई

सणसवाडी येथे झालेल्या हिंसाचारामागे काही हिंदुत्ववादी संघटना असल्याचा संशय व्यक्त करताना प्रशासनाने पुरेशी खबरदारी न घेतल्याने हा प्रकार घडला असावा अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. जे घडले ते महाराष्ट्राला शोभणारे नाही. त्यामुळे हे प्रकरण अधिक चिघळणार नाही याची दक्षता सर्वांनीच घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.

काही हिंदूत्ववादी संघटनांनी पुणे शहरात येवून ३-४ दिवसापासून चिथावणी देण्याची भूमिका घेतली होती असे तिथले लोक सांगत आहेत. त्यामुळे आधीपासूनच इथे अस्वस्थतेचे वातावरण होते. भीमा कोरेगाव येथे लाखोच्या संख्येने लोक येणार हे माहित असताना यंत्रणेने खबरदारी घ्यायला हवी होती. ती प्रशासनाने न घेतल्यामुळे अफवा आणि गैरसमज अधिक पसरल्यामुळे हा प्रकार घडल्याचे शरद पवार म्हणाले. भीमा कोरेगावप्रकरणात सामंजस्याची भूमिका घेवून सामाजिक सलोखा कायम राहील याची दक्षता घ्यावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

भीमा कोरेगावला दरवर्षी लोक जात असतात. आजपर्यंत कधीही तिथे स्थानिकांसोबत संघर्ष झालेला नाही. भीमा कोरेगावला २०० वर्ष पूर्ण झाली त्यामुळे मोठया संख्येने लोक येणार ही कल्पना होतीच. त्याठिकाणच्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तींनी घेतला असावा असेही शरद पवार म्हणाले. हे प्रकरण चिघळू देऊ नये. जे घडले त्याची चौकशी राज्यसरकारने करावी. घडलेला प्रकार शोभनीय नाही त्यामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाया लोकांनी सामंजस्य आणि संयमाने हा विषय हाताळावा, कोणीही प्रक्षोभक वक्तव्य करू नये असे आवाहन पवार यांनी केले.