चॅपल यांना प्रशिक्षक करणे सर्वात मोठी चूक, दादाची स्पष्टोक्ती

59

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने ग्रेन चॅपल यांना हिंदुस्थानी संघाचा प्रशिक्षक करणे ही कारकिर्दीतील सर्वात मोठी चूक असल्याची स्पष्टोक्ती दिली आहे. गांगुलीचे ‘ए सेंच्युरी इज नॉट इनफ’ हे पुस्तक काही दिवसात प्रकाशित होणार आहे. या पुस्तकातून गांगुलीच्या क्रिकेट जीवनातील अनेक गोष्टी उजेडात येण्याची शक्यता आहे. या पुस्तकामध्ये ग्रेन चॅपल यांच्याबद्दल दादाने खुलासा केला आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सौरव गांगुलीने चॅपल यांच्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

२००५ मध्ये चॅपेल यांची हिंदुस्थानच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली होती. चॅपल यांच्या नियुक्तीमागे गांगुलीची भूमिका मोलाची होती. विशेष म्हणजे या दोघांमध्ये प्रचंड मतभेद झाल्याने नंतर गांगुलीचे कर्णधारपदही गेले होते. चॅपलच आम्हाला नंबर एकच्या स्लॉटमध्ये घेऊन जाणारा सर्वांत चांगला प्रशिक्षक ठरेल, असे तेव्हा मला वाटले होते. प्रशिक्षकाचा शोध सुरू असताना मी जगमोहन डालमिया यांना चॅपलबाबत सांगून ठेवले होते.

डालमिया यांनी एका सकाळी बैठकीसाठी घरी बोलावले. ग्रेग यांचा भाऊ इयान यालाही ग्रेग हा हिंदुस्थानी संघासाठी योग्य प्रशिक्षक नसल्याचे वाटत होते. पण मी सर्वांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले आणि स्वत:चे डोके चालवले. त्यानंतरचा इतिहास तुम्हा सर्वांना माहीत आहेच. ग्रेग यांना कोच बनवणे आयुष्यातील सर्वांत मोठी चूक होती. यामुळे माझे फक्त कर्णधारपदच नव्हे तर एक खेळाडू म्हणूनही मला जागा देण्यात आली नाही, असेही दादाने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या