कोकणातल्या बाल्या लोकांनीच सुरू केला मुंबईचा गोविंदा

1
>> अरुण पुराणिक
मुंबई आणि दहीहंडी हे अतिशय अतूट असं नातं आहे. सुमारे १०० हून अधिक वर्षांचा इतिहास असलेला हा दहीहंडीचा उत्सव आता मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. पण, या उत्सवाचं मूळ मात्र कोकणात आहे. कोकण ते मुंबई असा गोविंदाचा प्रवास नेमका कसा झाला त्याविषयी मांडताहेत अरुण पुराणिक…
मुंबईतल्या दहीहंडीला १००हून अधिक वर्षांचा इतिहास आहे. प्रत्येक मोठ्या वाडीचा स्वतंत्र गोविंदा निघत. दहीहंडी उत्सव फक्त मराठी वस्तीतच साजरा केला जायचा. गुजराती आणि इतर अमराठी भाषिक वस्तीत हा उत्सव साजरा केला जात नसत. नारळी पौर्णिमेपासून मराठी वस्त्यांना गोविंदाचे वेध लागत. नारळी पौर्णिमेला दर्या शांत करण्यासाठी कोळी बांधव सोन्याचा नारळ समुद्राला अर्पण करत. नारळी पौर्णिमेच्या संध्याकाळी पहिला गोविंदा निघत. गुजराती समाज अष्टमीच्या दोन दिवसांपूर्वी कुटुंबीयांसोबत साटमटम अर्थात जुगार खेळत. मित्र मंडळी आणि नातेवाईकांसोबत पत्यांचा ते लोक जुगार खेळत.
गोकुळाष्टमीच्या दुसर्‍या दिवशी गोविंदा निघत. गोविंदाचे दोन प्रकार होते. चाळीतील जी मुलं असायची, त्यांच्या हंड्या चाळीतच असायच्या. वाडीतील गोविंदा हा मोठ्या मुलांचा म्हणजे तरुणांचा असायचा. कोकणातील बाल्या लोकांनी मुंबईतला गोविंदा सुरू केला. त्यावेळी प्रचलित जो बाजा होता त्याला कोंबडी बाजा म्हणायचे. ढाक्कू माक्कूम असा त्या वाद्याचा आवाज असायचा. हे वाद्य १९५० पर्यंत प्रचलित होतं. १९५० साली अलबेला हा चित्रपट प्रदर्शित झाला. बच्चू भाई ढोली यांनी भोली सूरत दिल के खोटे हे गाणे आल्यानंतर कच्छी बाजा आणला. गुजरातच्या कच्छ भागातला हा प्रकार असून दोन ढोल आणि दोन पिपाण्या असे या वाद्याचे स्वरूप होते.
चाळीतील सुशिक्षित आणि पांढरपेशा कुटुंब आपल्या मुलांना या दहीहंडी सामील करत नसत. मुंबईतील जे काही दादा लोक होते त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या हंड्या बांधल्या जात. म्हणजे रामचंद्र भाई, भाई असोलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दहीहंडी लावण्यास सुरुवात झाली. या हंड्याचे बक्षीस म्हणून गदा किंवा तलवारी असायच्या. बक्षीस म्हणून पैसे देण्याची पद्धत तेव्हा नव्हती. मानाच्या गदा त्यावेळी दिल्या जात. पूर्वी ज्या मिरवणुका निघत त्या खांद्यावर गदा मिरवत निघत. याच मिरवणुकीत लाठी फिरवणं, दांडपट्टा फिरवणं असे साहसी प्रकारही चालत. या दरम्यान संयुक्त महाराष्ट्र चळवळी सुरू झाली. या चळवळीच्या पार्श्वभूमीवर अनेक देखावे केले जात. पूर्वी पथकं बैलगाडीवर निघत नंतर ट्रक आणि लॉरीचा वापर सुरू झाला. त्याकाळी जे जे सामाजिक प्रश्न असायचे त्यावर आधारित चित्ररथांची निर्मिती पथकांकडून केले जात. त्यात दारू बंदी, तक्तालीन सरकाच्या विरोधातील देखावा असे वेगवेगळ्या विषयांचा समावेश असायचा.
गोविंदा पथकात हंडी फोडणारी मुलं वेगळी असायची आणि नाचणारे लोक वेगळे असायचे. अशी दोन पथके एका गोविंदा समुहात असायची. त्यात व्यायामशाळा या गोविंदा पथकाशी संलग्न असायच्या. व्यायामशाळेतील तरुण या समुहात असल्याने त्यांच्यात एक शिस्त असायची. दारू पिणार्‍यास हंडीवर चढू दिले जात नसे. व्यायामशाळेतील शिक्षक यांचे सराव घेत. त्यांना मास्तर म्हणत. या गोविंदा पथकात कबड्डी खेळांडूचाही समावेश असे.
थर हे फारतर पाच ते सहा असत. २० ते २५ फुटांपर्यंत हे थर असत. प्रत्येक भागात त्या त्या प्रतिष्ठेच्या हंड्या असत. रामचंद्र इमारतीची हंडी, ठाकूरद्वारची हंडी या प्रतिष्ठेच्या हंड्या असत. या हंड्या फोडण्यासाठी सकाळी ही गोविंदा पथकं सकाळी ८-९ च्या सुमारास निघत. त्या त्या भागातल्या हंड्या फोडून संध्याकाळी ५-६ वाजेपर्यंत हा उत्सव संपत असे. आजच्या सारखे रात्री उशिरापर्यंत या हंड्या फोडल्या जात नसत. गिरगाव चौपाटीला या दहीहंडीचा उत्सव संपन्न होत असे. गिरगाव चौपाटीवर आंघोळ करून आपापल्या घरी सगळी मंडळी परत जात. थर लावण्याची स्पर्धा नव्हती. त्यामुळे पडून जखमी आणि मृत्यू होण्याची शक्यता तशी कमी होती.
दहीहंडीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

गोविंदा हा फक्त गिरगाव आणि दक्षिण मुंबईतच साजरा केला जात असे. मुंबईच्या उपनगरातही हा उत्सव तसा साजरा केला जात नसे. 1963 साली ब्लफमास्टर हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याचे संगीतकार कल्याणजी-आनंदजी हे गिरगावातच वाढलेले. मनमोहन देसाई हे खेरवाडीतले. या मंडळीनी गिरगावातील दहीहंडी बॉलिवूडमध्ये आणली. शम्मी कपूरच्या ‘गोविंदा आला रे आला…’ या गाण्यामुळे दहीहंडी बॉलिवूड आणि देश विदेश पातळीवर पोहोचली. बॉलिवूड आणि राजकारण्यांमुळे हा उत्सव उपनगरातही पोहोचला.

उपनगर आणि ठाण्यातली हंडी

दहीहंडी हा उत्सव फक्त दक्षिण मुंबईत साजरा केला जात असत. जसजसा या भागातला मराठी समाज उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात स्थलांतर झाला तसतसा दहीहंडी हा उत्सव उपनगर आणि ठाणे भागात साजरा करण्यास सुरुवात झाली. गेल्या ३०-४० वर्षात या उत्सवाला उपनगरात आणि ठाणे भागात सुरुवात झाली.
सलामी
नंतरच्या वर्षात गोविंदा पथकांचे प्रमाण वाढले. आपल्या दहीहंडीला जास्तीत जास्त गर्दी व्हावी असा प्रत्येकाचा अट्टाहास असायचा. त्यात वेळेत जर कोणी हंडी फोडली तर त्यात हंडीला महत्त्व राहत नसत. म्हणून सलामी हा प्रकार आला. सलामी देऊन काही ठराविक रक्कम गोविंदा पथकाला देण्यास सुरुवात झाली. त्यामुळे चार थर, आठ थर लावल्यास ठराविक बक्षीस मिळत असे. त्यामुळे हे सलामीचे प्रकार वाढले.
इव्हेंट
आपल्याकडे जास्तीत जास्त गर्दी वाढावी यासाठी आयोजकांनी सेलिब्रिटींना बोलवण्यास सुरुवात केली. एक दहीहंडी फुटल्यानंतर दुसरे पथक येण्यास वेळ लागत. मधल्या वेळेत सेलिब्रिटी येत मनोरंजनात्मक कार्यक्रम राबवून लोकांना आकर्षित करण्यास सुरुवात झाली. टी.व्हीवर याचे थेट प्रक्षेपण करण्यास सुरुवात झाली.
प्रतिष्ठा
पूर्वी फूलबाजार, आयडीयल सारख्या हंड्या या प्रतिष्ठेच्या हंड्या होत्या. त्यांच्यावर कुठल्याच मोठ्या रकमेचे बक्षीस नसायचे. पण त्या प्रतिष्ठेच्या समजल्या जायच्या.
गोविंद पथकातील वर्ग
या गोविंदा पथकाथील वर्ग हा बहुतांश मध्यम आणि निम्न आणि गरीब घरातला आहे. ८०च्या दशकात गिरण्या बंद झाल्या. रोजगाराचे मोठे प्रश्न निर्माण झाले होते. पण याकाळात देखील या गोविंदा पथकांचा मुंबईतल्या तरुणांना आधार झाला.
शब्दांकन- तुषार ओव्हाळ