संतमहात्म्यांची दीपावली

>>नामदेव सदावर्ते<<

साक्षरता प्रसार, स्वच्छता मोहीम, अंधश्रद्धा निर्माण करणाऱ्या रूढींचे पालन न करता ज्ञानोपासना करून ईश्वरभक्ती करावी. शुद्ध आचरण करणाऱ्या संतांनी देवाला आपल्या घरी आणून आनंद दीपावली साजरी केली. समाजाला स्नेहरूप तेल देऊन शिर्डीत साईनाथांनी दीपावली साजरी केली. दिवाळी सणात वा मोठय़ा उत्सवप्रसंगी जत्रा, यात्रेच्या ठिकाणी गाडगेबाबा व त्यांचे शिष्यगण झाडू घेऊन सारा गाव व परिसराची साफसफाई करीत असत. समर्थांनी बलोपासनेचा संदेश देऊन मंदिरातील देवता दिवे लावून प्रकाशमान ठेवावे असे सांगितले. अशी संतमहात्म्यांची दीपावली संतचरित्रात आढळते. संत नामदेव म्हणतात, नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ।।

दीपावलीचीसुद्धा इतर सणांप्रमाणेच प्राचीन वेदकालीन परंपरा आहे. दीपावली म्हणजे दीपोत्सव. दीपोत्सव करून अंधःकारावर मात करून सर्वत्र ज्ञानदीपाचा प्रकाश निर्माण करावयाचा असतो. अंधःकार म्हणजे अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्य, गुलामगिरी, रूढीग्रस्तता या सर्वांवर ज्ञान-प्रकाश निर्माण करून मात करावयाची असते. त्यासाठीच दीपोत्सव साजरा करावयाचा असतो. देवघरापासून अंगण, तुलसी वृंदावनापर्यंत संपूर्ण सदन दीपावलींनी, आकाशकंदिलाने उजळून आपण लक्ष्मीचे व सर्वच देवदेवतांचे स्वागत करीत असतो.

पण या रूढ दीपावलीपेक्षा संतमहात्म्यांची दिवाळी वेगळी असते. संतमहात्मे ज्ञानाचे पूजन, देवदेवतांचे पूजन करतात. संत नामदेवांच्या घरी तर दर दिवाळीत प्रत्यक्ष विठ्ठलच जात असे. नामदेव श्रीविठ्ठलास मोठय़ा भक्तिभावाने घरी आणीत असत.

सण दिवाळीचा आला । नामा राऊळासी गेला ।।

हाती धरूनी देवासी । चला आमुच्या घरासी ।।

देव तेथुनी चालिले । नामयाच्या घरा आले ।।

गोणाईने उटणे केले । दामाशेटीने स्नान केले ।।

पदर काढिला माथ्याचा । बाळ पुशिला नंदाचा ।।

हाती घेऊनी पंचारती । चक्रपाणी ओवाळती ।।

जेवुनिया तृप्त झाले । दासी जनीने विडे दिले ।।

नामदेवांनी हात धरून घरी आणलेल्या श्रीविठ्ठलास गोणाईने डोळे भरून पाहत पाहत चंदनाच्या पाटावर बसवून त्यास उटणे लावले. मग दामाशेट श्रीविठ्ठलास गरमगरम पाण्याने अभ्यंगस्नान घालीत असे. भगवंतास भक्तांनी घातलेल्या या स्नानाचे फार कौतुक. राजाई, गोणाई व जनाबाईने तयार केलेला दिवाळीचा फराळ भगवंतास मोठय़ा भक्तिभावाने खाऊ घालीत. मग तृप्त झालेल्या विठोबास जनाबाईने विडे देई. नामदेव भगवंताचे रूप अंतर्यामी साठवीत हात जोडून उभे राहत. अशी दरवर्षी नामदेवाची दीपावली, जिथे सुख, ऐश्वर्य, आनंद. योगीजनांनाही हे सुख दुर्लभ होते.

एका वर्षी मात्र भगवंतांनी दिवाळीस घरी येताना एक विलक्षण अट घातली. नामदेवाला देव म्हणाले, ‘‘नामया तू विठ्ठल होऊन माझ्या जागेवर उभा रहा!’’ देव आपल्या घरी दिवाळीसाठी यावेत म्हणून नामदेवांनी ही अट मोठय़ा आनंदाने मान्य केली. देवाने आपला पितांबर त्याला नेसावयास दिला. सारे दागिने नामदेवांच्या अंगावर घातले व विठ्ठलरूपात नामदेव देवाच्या जागी उभे राहिले.

नामयाचे अवखळ मन जागृत झाले. मी भगवंताचा पितांबर नेसलो आहे. मुकुट, कंठा हे सारे दागिने घातले. सारे लोक मलाच श्रीविठ्ठल समजून नमस्कार करतील. माझ्यापुढे पंचपक्वानाचे नैवेद्य ठेवतील. केवढे मोठे माझे भाग्य!

भगवंताचा मुकुट आपल्या शिरावर ठेवून, कर कटावर ठेवून नामा श्रीविठ्ठलाच्या जागेवर उभा राहिला, अगदी विठ्ठलासारखाच! नंतर मंदिरात भक्तगण येऊ लागले. थोडा वेळ अगदी सुखात गेला. भक्तगण नामाचा गजर करू लागले. नामदेवांचे पाय ताटकळू लागले. पोटात भूक लागली. नामदेव कटीवर हात ठेवून उभे राहून थकले, त्यांचे पाय दुखू लागले.

विठोबा मात्र नामदेवांच्या घरी आरामात हसत फराळाचे पदार्थ खात असतील हे त्यांच्या मनात आले. नामदेवांनी कळवळून देवाचा धावा केला. त्याची आर्त हाक ऐकून भगवंताने नामदेवांस मिठी मारली. नामया, मलासुद्धा तुझ्याशिवाय तुझ्या घरात चैन पडत नव्हती. मग नामदेव अश्रूपूर्ण नेत्रांनी देवास म्हणाले, ‘देवा, मी धन्य झालो.’

नामदेवांप्रमाणेच शिर्डीच्या साईबाबांची दिवाळी फारच आगळीवेगळी आहे, जगप्रसिद्ध आहे. पणत्यांमध्ये पाणी घालून साईबाबांनी सहस्रावधी दीप लावल्याची कथा प्रसिद्ध आहे. भक्तीचे रहस्य प्रकट करणारी ही कथा अलौकिक आहे. दीपावलीत आपले मंदिर, परिसर साईबाबांनी प्रकाशमय, पवित्र केला आणि सर्वत्र आनंद निर्माण केला. शिर्डी हा गाव साईबाबांच्या मंदिराभोवती जमा झाला. सर्वांना साईनाथ प्रकाशमय, चैतन्यमय व आनंदाचे निधान वाटू लागले. संतांनी सर्वत्र प्रकाश निर्माण केला. साईबाबांनी त्या पणत्यांत पाणीरूपी आत्मज्ञानाचे तेल टाकले. आजही ते आत्मज्ञान साईबाबा सर्वांना देत आहेत. तेल न देणाऱ्या कंजूष व शंकाखोर लोकांनाही बाबा स्नेहपूर्वक आजही आत्मज्ञानाचा प्रकाश देत आहेत. साऱ्या हिंदूंना साईबाबा प्रिय आहेत.

समर्थ रामदासांनी आपल्या महंतांना आणि शिष्यगणांना सर्वच उत्सव साजरे करून धनुर्धारी प्रभू रामचंद्राची भक्ती करण्यास आणि करवून घेण्यास शिकविले. ते आपल्या दासबोधातील ‘दास्य’भक्तीत म्हणतात, जयंत्या पर्व मोहोत्सना असंभाव्य चालती वैभव । जे देखता स्वर्गीचे देव । तटस्थ होती ।। याचा अर्थ समर्थांच्या अकरा मारुतीच्या म्हणजे सर्वच मठांत सर्व उत्सव साजरे होत असत. भगवंतास दीप लावून सतत प्रकाशात ठेवावे असे ते म्हणत. मठामध्ये भगवंताचे विशेष पूजन म्हणजे वेदपठणासह भजन, कीर्तन करावे. भगवंतांशी सख्यत्व जोडण्यासाठी मनुष्याने काय करावे? देवस्थानास काय काय द्यावे? तेव्हा समर्थ म्हणतात,

देवांचे वैभव सांभाळावें । न्यूनपूर्ण पडोंचि नेदावें ।

चढते वाढते वाढवावें । भजन देवाचें ।।

भंगली देवालये करावी । मोडली सरोवरे बांधावी ।

सोफे धर्मशाळा चालवावी । नूतनचि कार्ये ।।

जुनी बांधकामे मोडकळीस आली असतील तर त्यांचे जीर्णोद्धार करावेत, हे सांगणारे समर्थ ज्ञानरुप प्रकाशाचे महत्त्वही सांगतात. अंतरंगात ब्रह्म प्रकाशत आहे आणि बाहेर मायाही प्रत्यक्ष दिसत आहे, हे द्वैतनिरसन करण्यासाठी ज्ञानरूप प्रकाशाची गरज आहे. सूर्योदय झाल्यावर त्याच्या प्रकाशामुळे अंधार जसा नाहीसा होतो, तसे ज्ञानाच्या प्रकाशाने मिथ्या कल्पना नाश पावते.

आधुनिक काळात लोककल्याणाची दृष्टी बाळगणारे संत म्हणजे संत गाडगेबाबा. त्यांनी आपले दैवत पांडुरंगाबरोबरच समाजातील कुष्ठरोगी, भिकारी या लोकांनाही दैवत मानले. दीपावलीच्या सणात गाडगेबाबा कुष्ठरोगी व भिकाऱ्यांना शिरा, बुंदीचे लाडू इत्यादी गोड पक्वान्नाचे सुग्रास भोजन देत. भोजनानंतर प्रत्येकास वस्त्र्ा, पात्र, पांघरुण असे काही ते देत असत. आंधळे, पांगळे, लंगडे, कुरूप लोकांना बाबा तृप्त करीत असत. त्या सर्वांची राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून गाडगेबाबांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या. समाजसेवा हीच ईश्वरसेवा.

दिवाळी सणात वा मोठय़ा उत्सवप्रसंगी जत्रा, यात्रेच्या ठिकाणी गाडगेबाबा व त्यांचे शिष्यगण झाडू घेऊन सारा गाव व परिसराची साफसफाई करीत असत. या उदाहरणांवरून दीपावलीचा अर्थ, अंगणाची व परिसरातील स्वच्छता करावी असा आहे.

लक्ष्मीपूजन म्हणजे धन, मौल्यवान वस्तूंचे पूजन इतकाच मर्यादित अर्थ न मानता लक्ष्मीपूजन म्हणजे ज्ञानाची, ज्ञानियांची व ग्रंथांची पूजा करावयास हवी. ज्ञान, स्वावलंबन, परिश्रम करून संपत्ती प्रथम मिळवून तिचे पूजन करावयाचे असते. निरोगी शरीर हीसुद्धा आपली संपत्तीच असते म्हणून प्रातःकाली उठून अभ्यंगस्नान करावयाचे असते. शुद्ध मनाने भगवंताचे पूजन करावे.

साक्षरता प्रसार, स्वच्छता मोहीम, अंधश्रद्धा निर्माण करणाऱ्या रूढींचे पालन न करता ज्ञानोपासना करून ईश्वरभक्ती करावी. शुद्ध आचरण करणाऱ्या संतांनी देवाला आपल्या घरी आणून आनंद दीपावली साजरी केली. अशी संतमहात्म्यांची दीपावली संतचरित्रात आढळते.