‘पौष्टिक’ सेवा!

 >>दिलीप जोशी<<

पत्र पाठविण्याचा जगभरचा इतिहास खूप जुना आहे. माणसं परस्परांशी लिखित स्वरूपात व्यवहार करू लागली तेव्हा सांगावा धाडण्याची वेळ आल्यावर पत्रं पाठवली जाऊ लागली. सुरुवातीच्या ‘खलित्या’चं असायचं. याशिवाय समाजातल्या मान्यवर व्यक्ती परस्परांना आपले विचार ‘पत्र’ पाठवून कळवत असत. ‘पत्र’ हा शब्द भुर्जपत्रावरून आपल्याकडे रूढ झाला. विशिष्ट झाडाची साल लिखाणासाठी उपयुक्त ठरते हे लक्षात आल्यावर ती पत्र लिहिण्यासाठी वापरली जाऊ लागली.

नल-दमयंतीच्या कथानकात दमयंती नलराजाला पत्र पाठवते असा उल्लेख आहे. पत्र पाठविण्यासाठी ती शिकवलेल्या सुज्ञ हंस पक्ष्याला दूत बनवते. ही त्या काळातली ‘हवाई’ पत्रसेवाच (एअर मेल) म्हणायला हवी. या कथानकात तथ्य किती ते जाऊ द्या, पण सांगावा धाडण्याची संकल्पना निश्चितच छान आहे. कालांतराने दूत, जासूद किंवा युरोपात ‘रनर’ पत्र घेऊन जाऊ लागले. दिवसाकाठी तीस-चाळीस मैलांचा खडतर प्रवास चालत किंवा धावत करण्याची क्षमता असणारे हट्टेकट्टे ‘रनर’ वेगाने निरोप घेऊन जात आणि निरोपाचं पत्र देऊन त्याचं उत्तर घेऊन तसेच धावत परत येत.

युरोपातील राजवटी स्थिरावल्यानंतर तिथे ज्या आधुनिक सुधारणा होऊ लागल्या त्यापैकी सर्वसामान्यांसाठी पोस्टाची सेवा ही एक गोष्ट होती. हिंदुस्थानात ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य १७५७ मध्ये स्थिरावलं. त्यांच्या इंग्रजी पद्धती इकडे येऊ लागल्या. वॉरन हेस्टिंग्ज हिंदुस्थानचा गव्हर्नर जनरल असताना मार्च १७७४ मध्ये सर्वसामान्य लोकांचे संदेश परस्परांकडे पाठवण्यासाठी सरकारी यंत्रणा असावी असा विचार झाला. त्यातूनच हिंदुस्थानी पोस्ट सेवेची सुरुवात झाली. अर्थात सुरुवातीची सेवा सरकारी बाबूंपुरतीच मर्यादित होती. १८३७ मध्ये पोस्ट ऑफिस ऍक्ट आला. ईस्ट इंडिया कंपनीला हिंदुस्थानात सामान्यांसाठी टपाल सेवा सुरू करण्यासाठी ब्रिटिश सरकारने परवानगी दिली. १८५० पासून पोस्ट – ऑफिस अस्तित्वात आलं. या वेळी टपालाच्या वजनानुसार टपाल हशील आकारलं जाऊ लागलं. त्यापूर्वी ते वजनाबरोबरच अंतरावरही अवलंबून असे. १८५८ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची सद्दी संपली आणि हिंदुस्थानची वसाहत थेट ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या अधिपत्याखाली आली. राणी व्हिक्टोरियाच्या प्रदीर्घ कारकीर्दीत हिंदुस्थानात ज्या सुधारणा झाल्या त्यामध्ये पोस्ट ऍण्ड टेलिग्राफ सेवेचा समावेश होता. रेल्वे १८५३ मध्येच सुरू झाली होती. त्याचा फायदा टपाल सेवेला झाला. ट्रेनला टपालाचा लाल डबा जोडलेला असेल तर ती ‘मेल’ म्हणून ओळखली जाऊ लागली. सध्याच्या दिवाळीच्या दिवसांत तर या नात्याचं महत्त्व अधिक.

१८ फेब्रुवारी १९११ रोजी अलाहाबाद ते नैनी उड्डाणाने हवाई टपाल सेवा १९११ हिंदुस्थानात सुरू झाली. १५ किलोग्रॅम वजनाची सुमारे ६००० कार्डं या वेळी नेण्यात आली. त्याआधीच पोस्टाचं ‘कार्ड’ हे सर्वसामान्यांच्या परिचयाचं झालं होतं. त्याचं ‘कार्ड’ असं मराठी रूपांतर लोकांनीच केलं. लांब राहणाऱ्या नातेवाईकांना ‘घरी पोहोचलात की लगेच कार्ड टाका’ असं आवर्जून सांगितलं जायचं. १९७०च्या काळात आमच्या पिढीनेही दूरचे नातेवाईक, मित्र यांना कार्ड पाठवण्याचा परिपाठ जोपासला होता.

आजच्या ई-मेल, ऍप वगैरेंच्या जमान्यात हाती लिहिलेल्या पत्राची काय मजा होती ते कळणं कठीण. हस्ताक्षरातील पत्रातून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व समोर यायचं. प्रत्यक्ष भेटत आहोत, बोलत आहोत असं वाटायचं. कधी कधी एकाच वेळी बरीच पत्रं यायची. आडव्या ओळीत लिहिलेलं पत्र बहुदा दुःखाची बातमी देणारं असा एक संकेत होता. एरवी मजकूर पत्राच्या त्याच्या आकारानुसार उभ्या पद्धतीने लिहिला जायचा. कार्ड सगळय़ात स्वस्त, त्यानंतर जास्त मजकुरासाठी आंतर्देशीय आणि त्याहून काही लिखाण असेल तर पाकीट. सामान्य माणसाचा सखा म्हणजे कार्ड.

पोस्टाच्या सेवेने दूरदेशींची माणसं जवळ आणली. त्यांच्यातला संवाद सुखावून टाकणारा असायचा. कोणाचं पत्र आलं ते शेजाऱ्यांनाही सांगितलं जायचं इतका मोकळेपणा होता. बहुतेक पत्रं ख्यालीखुशालीची असायची. खरं तर ‘खुशाली’ कळवण्यासाठीच पत्र लिहिलं जायचं. ‘पत्र टाका’ हा वाप्रचार पत्र लिहून पोस्टाच्या पेटीत टाकण्यावरून आला. कार्ड, पाकिटं, मनी ऑर्डरी यांचा गठ्ठा भरलेली खाकी बॅग आणि शिवाय हातात काही पत्रं अशा सामुग्रीसह ‘पोस्टमन’ यायचा. घरोघर त्याचं नातं असायचं. उन्हातान्हात पायपीट करावी लागणाऱ्या या टपालदात्याला ‘काका’ म्हटलं जायचं. पाणी, सरबताची विचारणा व्हायची. ‘काकां’नाही सगळय़ांचे सगळे नातेवाईक ठाऊक असायचे.

पोस्ट खात्याने कष्टाळू माणसांची संस्कृती निर्माण केली. जनमानसात पोस्टाची संस्था रुजली. पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखकालाही ‘पौष्टिक’ जीवनावर लिहावंसं वाटलं. जगात ९ आणि हिंदुस्थानात १० ऑक्टोबर हा पोस्टाचा दिवस असतो. ‘पोस्ट’ या शब्दाचंही ‘पोष्ट’ असं मराठीकरण झालं. काळाबरोबर ही ‘पौष्टिक सेवा’ बदलली. स्पीड पोस्टपासून अनेक नव्या गोष्टी आल्या. लाल सायकलवरून येणारा ‘तार’वाला तर इतिहासजमा झाला तो ‘कडकट्टा’चा जमाना संपला तरी इलेक्ट्रॉनिक युगातही पोस्ट टिकून राहील. ‘पोस्टमन’च्या सेवेचा उल्लेख ‘हवा येऊ द्या’सारख्या कार्यक्रमात हृद्य स्वरूपात होते. हे पोस्टाचं आणि सामान्यांचं दोन शतकांच्या नात्याचं द्योतक आहे.