शापित सोमनाथ

>> द्वारकानाथ संझगिरी

सोमनाथच्या मंदिराने जे भोगलंय, ते हिंदुस्थानातल्या इतर मंदिरांनी फार क्वचित भोगलंय. सुख, लूटमार, पुन्हा वैभव, पुन्हा विध्वंस आणि पुन्हा वैभव!

या मंदिराचा जन्मच शापातून झाला. चंद्राला दक्षा प्रजापतीने म्हणजे त्याच्या सासऱ्यानेच शाप दिला.
चंद्राने त्याचे काय घोडे मारले होते?

चंद्राने दक्षाच्या २७ मुलींबरोबर लग्न केले. त्यातल्या फक्त रोहिणीवर त्याने जास्त प्रेम केले. इतरांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे दक्षाने त्याला शाप दिला की, तुझी चमक-धमक निघून जाईल. चंद्र क्षणात निस्तेज झाला.
मग चंद्राने काय केले असेल?

चंद्र ब्रह्माकडे गेला. ब्रह्माने त्याला सल्ला दिला की, ‘‘जा आणि शिवाची पूजा कर.’’ तो त्यातल्या त्यात चटकन प्रसन्न होणारा देव. शिव प्रसन्न झाला. चंद्राला पुन्हा तेज मिळाले. त्याने तिथे सत्ययुगात सोन्याचे मंदिर बांधले. त्याच्या पुढच्या युगात रावणाने तिथे चांदीचं मंदिर बांधलं. हे घडले त्रेतायुगात! म्हणजे ते मंदिर उद्ध्वस्त झाले असले पाहिजे. मग कृष्णाने द्वापारयुगात लाकडाचे मंदिर उभारले (पुन्हा तेच घडले असावे).

पुराणकाळ इथे संपतो. मग दगडाच्या मंदिरावर ऐतिहासिक काळात अनेक हल्ले झाले. अनेक जखमा या मंदिराने सोसल्या. मंदिराच्या पोटात मशीद उभी राहिली. १९५१ साली सरदार वल्लभभाई पटेल आणि के. एम. मुन्शींनी या मंदिराला पुन्हा वैभव दिले. आता तिथे गेल्यावर एक वैभवशाली मंदिर पाहायला मिळते.

आम्ही तिथे द्वारकेहून गेलो. या रस्त्यावर दोन-तीन गोष्टी जाणवल्या. वाळवंट कमी आणि हिरवागार निसर्ग होता. वाटेत सध्या आपला देश रिमोट कंट्रोलने चालवणाऱ्या अंबानी कुटुंबाचे गाव. गावातले घर लागले. सॉरी, चुकलो. ‘घर’ हा शब्द आपल्या झोपड्यासाठी असतो, त्यांचे प्रासाद असतात आणि तो प्रासादच होता. आमच्या टॅक्सी ड्रायव्हरने एका गल्लीजवळ गाडी थांबवून इथून पुढे सर्व अंबानींचे आहे असे सांगितले. गरुडाची नजरसुद्धा कदाचित कमजोर ठरली असती. तिथून जिथे राजकोट – सोमनाथ हमरस्ता लागतो त्या बेचक्यावर मी नारळपाणी प्यायलो. इतके गोड नारळपाणी मी क्वचित प्यायलो असेन. २५ रुपयांत नारळपाणी येऊ शकते आणि तेही इतके स्वर्गीय यावर अलीकडच्या काळात विश्वास ठेवण्यापेक्षा मी बोकिलांच्या अर्थशास्त्रावर जास्त विश्वास ठेवला असता.

सोमनाथला अनेक सुंदर हॉटेल्स आहेत. ‘धार्मिक टुरिझम’मुळे तिथे पर्यटकांची प्रचंड वाढ झालीय. ‘धार्मिक टुरिझम’ ही संकल्पना वाईट नाही. देवळाकडे फक्त भक्त आकर्षित होतात असे नव्हे, कलेचे पुजारीही आकर्षित होतात आणि सोमनाथाचे देऊळ सुंदर स्थापत्यशास्त्र्, मूर्तिकला, शिल्पकला यांचे ‘कॉलेज’ ठरावे. ते मंदिर नुसते लांबून पाहताना मन प्रसन्न होते, डोळय़ांचे पारणे फिटते. त्यासाठी तुम्ही शिवभक्तच असायला पाहिजे असे नाही. जे कट्टर भक्त असतात, त्यांच्यासाठी ते बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिलं ज्योतिर्लिंग आहे ही गोष्ट जास्त महत्त्वाची ठरू शकते. मी सश्रद्ध आहे, पण मला मंदिरातले शिल्पसौंदर्य, तिथे कधी कधी असणारी गंभीर शांतता आकर्षित करते. मंदिरात शिरायला झेड सिक्युरिटी आहे. त्यामुळे बडव्यांचा त्रास फारसा होत नाही, पण तिथे एक गोष्ट मला खटकली. तिथे अहिंदूंना (हिंदू नसणाऱ्यांना) वेगळी परवानगी घ्यावी लागते. अहिंदू म्हणजे कोण? या प्रश्नाचे मला नीट उत्तर मिळाले नाही. म्हणजे त्यात जैन, बौद्ध, शीख ही हिंदू धर्माची बंडखोर मुलेबाळे आली की फक्त ख्रिश्चन आणि मुस्लिम आले? सिक्युरिटीच्या कारणासाठी हे केले गेलेय असे सांगितले जातेय. सोमनाथाचे मंदिर हे अतिरेक्यांच्या टार्गेटवर असू शकते. कारण या मंदिराचा इतिहासच रक्तरंजित आहे, पण एकदा सिक्युरिटी चेक लावल्यावर हा परवानगीचा अडथळा कशाला? आता अतिरेकी जगात कुठेही संचार करीत असतात. सेंट पीटर्स चर्च (रोम), सेंट पॉल चर्च (लंडन), नोत्रदाम (पॅरिस) वगैरे चर्चना आता सिक्युरिटी आहे, पण मंदिर प्रवेशासाठी धर्मीय अट नाही. मी जगभरातले अनेक सुंदर चर्च, मशिदी, शीख, ज्यूंची प्रार्थनास्थळे पाहिली आहेत, पण हा प्रकार कुठेही नव्हता. सिक्युरिटीच्या नावाखाली ही मध्ययुगातल्या संकल्पनांना घातलेली साद नाही ना? मंदिर प्रवेशातले अडथळे दूर करण्याचा प्रयत्न होत असताना हे नवे अडथळे कशासाठी? या मंदिराच्या ट्रस्टवर कोण कोण आहेत हे मी सांगण्याची गरज नाही.

असो. माझ्या मनातल्या बंडखोर विचारांना शांत करत मी मंदिरात प्रवेश केला. एकदा वाटले होते की जाऊन सांगावे, मी बौद्ध आहे किंवा ख्रिश्चन आहे किंवा मुस्लिम आहे. मला परवानगीची पद्धत अनुभवता आली असती.

ते सुंदर स्वप्नासारखे भासणारे मंदिर माझे मन इतिहासात रमल्यावर भेसूर दिसायला लागले. त्या मंदिरावरच्या जुन्या जखमा मला वाहताना दिसायला लागल्या. पुराण काय सांगते ते मी तुम्हाला सांगितले. आता इतिहास काय सांगतो ते ऐका. पहिले मंदिर तिथे कधी बांधले होते याची नोंद नाही, पण दुसरे मंदिर त्याच जागी यादव राजा ‘वल्लभी’ने ख्रिस्तोत्तर ६४९ मध्ये बांधले, ते ७२५ साली सिंधच्या जुनैद या अरब गव्हर्नरने तोडले. पुन्हा ते गुजरातचा राजा नागभट्ट द्वितीयने ८१५ साली उभारले, पण जखमांचा खरा इतिहास सुरू होतो सन १०२४ पासून! ते महम्मद गझनीने लुटले. त्यावेळी फक्त पाच हजार सैनिक होते त्याच्या बरोबर! दोन कोटी दिनारचा (अरबी चलन) ऐवज गझनी घरी घेऊन गेला. त्याचा मूळ उद्देश लूट असावी आणि मंदिराला फार मोठी इजा झाली नसावी. कारण १०३८ साली तिथे भक्त येत अशी नोंद आहे. त्यात मंदिराचे नुकसान झाल्याचा उल्लेख नाही. गझनीच्या काळात ते मंदिर लाकडाचे असावे (कृष्णाने बांधलेलेच असेल का?). पुढे लाकूड सडल्यामुळे ते दगडात उभारले गेले. कुमारपालने ते ११४३-७२ या काळात उभारले. त्यावेळी अशी नोंद आहे की, त्या मंदिरात हिरेमाणके लावली होती. मंदिरात धन ओतायचे ही आपली परंपरा किती जुनी आहे ते पहा. आजही जनता गरीब असली तरी देवांना श्रीमंतीत ठेवायची आपली हौस कमी झालेली नाही. इतके धन मंदिरात ठेवल्यावर मुस्लिम हल्लेखोरांची नजर का जाणार नाही? पुढची लूट अल्लाऊद्दीन खिलजीचा सेनापती उलूगखानने केली. त्याने १२९९ साली वाघेला राजा कर्णाचा पराभव केला.

सोमनाथ लुटले आणि नंतर अभिमानाने सांगितले, ‘‘५० हजार काफिरांना कंठस्नान घातले. २० हजार लोकांना गुलाम केले आणि प्रचंड मोठे गोधन पळवले. सोमनाथाची मूर्तीसुद्धा पळवली,’’ पण मग जालोरचा राजा कन्हादादेवाने प्रतिहल्ला केला, गुलामांना सोडवले आणि मूर्ती मिळवली. पुन्हा जखमा भरण्याचे काम सौराष्ट्राच्या चुडासामा घराण्यातल्या राजा महिपाल देवाने केले. अमीर खुस्रोने लिहून ठेवलेय की, गुजरातचे मुस्लिम भक्त हजला जाण्यापूर्वी सोमनाथाचे दर्शन घेत. म्हणजे चौदाव्या शतकात इतर धर्मीयांना मंदिर बंदी नव्हती. उलट त्यावेळी सतत केलेल्या लुटीमुळे जास्त कडवेपणा हिंदूंमध्ये यायला हवा होता. मी इतिहास तज्ञ नाही, पण इतिहासाबद्दल मला प्रेम आहे. महम्मद गझनीने १७ वेळा स्वारी करून लुटालूट केली. तितक्या वेळा आपण ‘लुटी’ची सोय का केली? कधी एकत्र येऊन कडवा प्रतिकार केला का? सैन्याची ताकद वाढवली का? की फक्त देवळे सुशोभित करण्यावर धन उडवले?

ही लुटालूट पुढे सुरूच राहिली. कधी मुस्लिम राजे, कधी मुगल राजे, पोर्तुगीजांनीही सोडले नाही. शेवटी मराठी माणूसच मदतीला धावला. १७८२-८३ मध्ये महादजी शिंदेने अहमदशहा अब्दालीला हरवले आणि लाहोरहून लुटलेले तीन चांदीचे दरवाजे परत आणले, पण सोमनाथाच्या पुजाऱ्यानी ते देवळासाठी वापरायला दिले नाहीत. का तर दरवाजे पण अपवित्र झाले. शिवाजी महाराजांनी मुसलमान झालेल्या नेताजी पालकरची मुलगी सून म्हणून कुटुंबात घेतली. यांना स्वतःचा दरवाजा घेता आला नाही. शेवटी ते उज्जैनच्या मंदिराला लावले. तिथल्या शंकराला ते चालले. काय हा मतभेद! ब्रिटिशांचेही लक्ष होतेच. ब्रिटिशांनी प्रार्थनास्थळ बाटवणे वगैरे प्रकार केले नाहीत. त्यांना आर्थिक आकर्षण जास्त होते. त्यांनी संपत्ती हडप केली. असा एक समज होता की, सोमनाथाचा चंदनी लाकडाचा १६ फुटी दरवाजा गझनीच्या महम्मदाने लुटून नेला आणि तो अफगाणिस्तानमध्ये त्याच्या बखरीला लावलाय. ब्रिटिशांनी तो तिथून लुटला. मग कळले की, गझनीच्या गावच्या देवदार लाकडाचा तो आहे. आग्र्याच्या किल्ल्याच्या स्टोअर रूममध्ये तो अजून पडून आहे. स्वातंत्र्यानंतर आजचे मंदिर कसे उभे राहिले ते पुढच्या वेळी!

आपली प्रतिक्रिया द्या