निकाह करून मोक्काचा आरोपी बायकोसह भुर्रर्र…


सामना प्रतिनिधी, ठाणे

आंबिवलीच्या प्रसिद्ध इराणी पाड्यात निकाह निमित्त मोठी लगबग सुरू होती. ‘हिस्ट्री शिटर’ आणि मोक्काचा आरोपी असलेला नवरदेव भरजरी कपडे घालून सर्वांचे स्वागत करीत होता. त्याने गिफ्ट घेतली. निकाह निमित्त जेवणावळीही उठल्या… निकाह लागताच तो आपल्या पत्नीसह पळूनही गेला. त्यानंतर चित्रपटातील दृश्याप्रमाणे पोलीस तब्बल दोन तास लेट आले. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केलेल्याचे नाव आहे अब्बास इरानी.

आंबिवलीमधील इराणी पाडा हा गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे. तिथे चेन स्नॅचिंगपासून अगदी दरोडा टाकणारे आरोपीही राहतात. गुन्हेगारांची वस्ती म्हणूनच हा पाडा ओळखला जातो. तिथेच राहणारा अब्बास इरानी याच्यावर विविध गुन्ह्यांप्रकरणी एक नव्हे तर दोन मोक्का लावले आहेत. या वॉण्टेड आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जंग जंग पछाडले. पण त्याचा शोध लागला नाही.

बुधवारी रात्री अब्बास ‘भाई’ चा निकाह असल्याने मोहल्ल्यातील त्याच्या फंटर्सनी मोठी गर्दी केली होती. डीजे..फटाके.. दारू.. मटण असा फक्कड बेत होता. मात्र मोक्काच्या वॉण्टेड आरोपीचे वाजत-गाजत लग्न लागत असल्याची खंबरबातही पोलिसांकडे नव्हती. बातमी मिळाली तेव्हा मात्र खूप उशीर झाला होता.