मुंबई, कोलकातासाठी आज ‘करो या मरो’, जिंकणारा संघ आयपीएल जेतेपदासाठी पुण्याशी झुंजणार

सामना ऑनलाईन, बंगळुरू

यंदाच्या आयपीएलमध्ये साखळीत शानदार खेळ करीत प्ले ऑफमध्ये पोहोचलेला व दोन वेळचा विजेता मुंबई इंडियन्स व दोनदा आयपीएल जिंकणारा कोलकाता नाईट रायडर्स संघांत उद्या शुक्रवारी बंगळुरूत ‘कांटे की टक्कर’ रंगणार आहे. पराभव म्हणजे स्पर्धेतून आऊट असे या लढतीचे समीकरण असल्याने या दोन माजी विजेत्यांसाठी उद्याची क्वालिफायर लढत हा ‘करो या मरो’ धर्तीची असेल. उद्या जिंकणारा संघ रविवारी हैदराबादमध्ये होणाऱ्या आयपीएल अंतिम लढतीत रायझिंग पुणे सुपरजायंट संघाशी विजेतेपदासाठी झुंजणार आहे. कोलकाता संघ उद्या साखळीतील पराभवाचे उट्टे फेडण्यासाठी मुंबईविरुद्धच्या लढतीत जोरदार खेळ करणार हे निश्चित. मात्र मुंबईच्या ‘स्टार’ फलंदाजांना सूर गवसल्यास कोलकाता संघापुढचे आव्हान अधिकच कठीण होणार आहे.

मुंबई संघाने यंदाच्या १०व्या आयपीएल क्रिकेट हंगामात कोलकाताला दोनदा पराभूत केले आहे. त्यामुळे उद्याच्या लढतीत मुंबईचे पारडे काहीसे जड असेल. मात्र पहिल्या क्वालिफायर लढतीत पुण्याकडून पत्करलेल्या दारूण पराभवाचे शल्य मुंबईच्या खेळाडूंना विसरावे लागणार आहे. अन्यथा यंदा दमदार खेळ करणारा कोलकाता नाईट रायडर्स संघाला तिसऱ्यांदा हरवणे मुंबईला शक्य होणार नाही. साखळीत मुंबईने १० तर कोलकाता संघाने ८ लढती जिंकल्या आहेत. काल पहिल्या क्वालिफायरमध्ये पावसाच्या व्यत्ययानंतर कोलकाता संघाला डकवर्थ लुईस नियमानुसार विजयी घोषित करण्यात आले होते. उभय संघ तुल्यबळ असल्याने उद्या बंगळुरूत क्रिकेटशौकिनांना रंगतदार लढत पहायला मिळणार हे निश्चित

फलंदाजी ही मुंबईची ताकद
मुंबई इंडियन्सकडे कर्णधार रोहित शर्मा, कायरॉन पोलार्ड, अंबाती रायडू, लेंडल सिमन्स व यष्टिरक्षक पार्थिव पटेल या ‘स्टार’ फलंदाजांची मांदियाळी आहे. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्यात अथवा मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यात मुंबई संघ माहीर आहे. कर्णधार रोहित शर्मा व कायरॉन पोलार्ड यांना सूर गवसल्यास प्रतिस्पर्धी संघाची अवस्था कठीण होऊ शकते. या दोघांना रोखण्यात कोलकाताचे गोलंदाज यशस्वी ठरल्यास ते उद्या बाजी मारू शकतील. फलंदाजीसोबत लसिथ मलिंगा, जसप्रित बुमराह, मिशेल मॅक्लेनागन हे अनुभवी गोलंदाज मुंबईकडे आहेत.

कोलकाताची मदार मनीषवर
कोलकाता नाईट रायडर्स संघाची मदार फलदाजीत कर्णधार गौतम गंभीर, सुनील नरीन, मनीष पांडे व रॉबीन उत्थाप्पा यांच्या खेळावर अवलंबून आहे. मुंबईने गौतम गंभीर, मनीष पांडे व रॉबीन उत्थाप्पा यांना झटपट बाद केल्यास मुंबईचा विजय सुकर होऊ शकतो. गंभीरने या हंगामात ४८६ तर मनीष पांडेने ३८६ धावा नोंदवल्या आहेत. कोलकाताच्या गोलंदाजीची मदार उमेश यादव, ख्रीस वोक्स, नाथन कोल्टर नाईल व सुनील नरीन यांच्यावर असेल.

प्रतिस्पर्धी संघ
कोलकाता नाईट राइडर्स: गौतम गंभीर (कर्णधार) डॅरेन ब्रावो, ट्रेंट बोल्ट, पीयूष चावला, नाथन कोल्टर नाइल, कोलिन डे ग्रांडहोम, रिषी धवन, सायन घोष, शाकिब अल हसन, शेल्डर जॅकसन, ईशांक जग्गी, कुलदीप यादव, ख्रीस वोक्स, क्रिस लिन, सुनील नरीन, मनीष पांडे, युसूफ पठाण, सूर्यकुमार यादव, रॉबीन उथप्पा, उमेश यादव.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रित बुमराह, जोस बटलर, हरभजन सिंग, मिशेल जॉन्सन, मिशेल मॅक्लेनाघन, लसिथ मलिंगा, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, पार्थिव पटेल, कायरॉन पोलार्ड, नीतिश राणा, अंबाती रायुडू, जितेश शर्मा, कर्ण शर्मा, लेंडल सिमन्स, टीम साउदी, जगदीशा सुचित, सौरभ तिवारी, विनय कुमार.