हॉकी विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, हिंदुस्थानचा सोप्या गटात समावेश

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

नोव्हेंबर महिन्यात भुवनेश्वर येथे होणाऱ्या हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी यजमान हिंदुस्थानचा तुलनेने सोप्या गटात समावेश करण्यात आला आहे. २८ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने (एफआयएच) बुधवारी गटवारी आणि वेळापत्रक जाहीर केले.

हिंदुस्थानचा समावेश ‘क’ गटात करण्यात आला असून या गटात फक्त ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता बेल्जियम हा एकमेव तगडा प्रतिस्पर्धी संघ आहे. आशियाई चॅम्पियन हिंदुस्थान २८ नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपल्या अभियानास प्रारंभ करेल. त्यानंतर २ डिसेंबरला बेल्जियमविरुद्ध, तर ८ डिसेंबरला कॅनडाविरुद्ध हिंदुस्थानची गाठ पडणार आहे. हिंदुस्थानचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला मात्र गटफेरीत खडतर आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ‘ड’ गटात पाकिस्तानसमोर नेदरलॅण्ड, जर्मनी आणि मलेशिया या देशांचे आव्हान असेल. २८ नोव्हेंबर ते ९ डिसेंबरदरम्यान गटफेरीच्या लढती होतील. १२ व १३ डिसेंबरला उपांत्यपूर्व लढती होणार असून १५ डिसेंबरला उपांत्य व कास्यपदकाची लढत रंगेल. १६ डिसेंबरला अंतिम सामना होईल.

हॉकी विश्वचषक स्पर्धेची गटवारी
‘अ’ गट – अर्जेंटिना, न्यूझीलंड, स्पेन, फ्रान्स.
‘ब’ गट – ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, आयर्लंड, चीन.
‘क’ गट – बेल्जियम, हिंदुस्थान, कॅनडा, द. आफ्रिका.
‘ड’ गट – नेदरलॅण्ड, जर्मनी, मलेशिया, पाकिस्तान.