मुंबई विद्यापीठाच्या ‘होपलेस’ कारभाराला कंटाळून हातेकरांचा राजीनामा

फोटो -हातेकर यांच्या फेसबुक अकाऊंटवरून साभार

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.नीरज हातेकर यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय त्यांना मुंबई विद्यापीठाच्या होपलेस आणि कणा नसलेल्या यंत्रणेमुळे घेतला आहे. ही बाब त्यांनी स्वत: फेसबुकवरून जाहीर केली आहे. टीवायचे निकाल जाहीर करण्यासाठी राज्यपालांनी दिलेली डेडलाइन पाळण्यात कुलगुरू डॉ. संजय देशमुख सपशेल फेल झाले आहेत. डेडलाइनच्या आदल्या दिवशी तब्बल अडीच लाख उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी असल्यामुळे उद्याच्या निकालात विद्यापीठ नापासच होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यातच आज निकालांच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पाचपैकी तीन आस्थापनांच्या महत्त्वपूर्ण बैठका रद्द करण्याची नामुष्की विद्यापीठावर आल्याने निकालाचा प्रश्न आणखीनच चिघळला आहे. त्यातच हातेकरांच्या राजीनाम्यामुळे मुंबई विद्यापीठाची पार बदनामी झाली आहे.

हातेकर यांनी त्यांच्या फेसबुकवर काय लिहलंय ?

“मुंबई विद्यापीठात सध्या जे काही सुरू आहे, त्यामुळे मनाला प्रचंड वेदना होत आहेत. मुंबई विद्यापीठाबद्दल ज्यांना आत्मीयता कळवळा आहे त्यांनी एकत्र येऊन काहीतरी पावलं उचलण्याची वेळ आली आहे. ही पावलं काय असावीत, उच्च शिक्षणामध्ये बदल घडवून आणत त्यामध्ये सुधारणा कशी करता येईल यासाठी संयुक्त कृती समितीसोबत यंत्रणेत बदल झाला पाहीजे असं वाटणाऱ्यांनी जोडलं जाणं गरजेचं झालं आहे. आवाज न उठवता शांतपणे बसून राहण्याचे दिवस निघून गेले आहेत.  आणखी एक गोष्ट म्हणजे मी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. मला हे कळून चुकलं आहे की होपलेस आणि कणा नसलेल्या आणि कोणाची तरी कठपुतली बनून खुर्च्या उबवणाऱ्यांकडून चालवल्या जाणाऱ्या या यंत्रणेत राहण्यापेक्षा या यंत्रणेशी बाहेरून लढा देणं योग्य राहील”