होळी आजची, शिमगा रोजचा!

>> ज्योत्स्ना गाडगीळ

jyotsna-gadgil

‘होली है ‘ताई’ होली है, बुरा न मानो होली है।’ असं म्हणत आज बायकांनी ट्रेनमध्येच आपापले ‘रंग दाखवायला’, सॉरी! ‘रंग लावायला’ सुरुवात केली. उद्या सुट्टी असल्यामुळे ट्रेनमध्ये आजच होळीला उधाण आले होते. मात्र, कामावर जायचे असल्याने आपल्या सौंदर्याला बाधा येणार नाही, ह्याची पुरेपूर काळजी घेत सर्वांनी नैसर्गिक गुलाबी रंगात बोटांची पेरं बुडवून एकमेकींना जेमतेम रंग लावला. होळीचा रंग एकदा लागला, की तो चढणारच! झालेही तसेच…’रंग खेळू चला’ म्हणत बायकांनी परस्परांची मुखकमले रंगवून टाकली.

रंगात आलेल्या सगळ्या जणी भांग न पिताच झिंगू लागल्या होत्या. रोजच्या कलकलाटाची जागा हसण्या-खिदळण्याने घेतली होती. अशातच एकीने बॅगेतून ब्लूटूथ स्पीकर काढला आणि होळीचं पारंपरिक गीत ‘रंग बरसेssss’ लावत, फुल्ल वॉल्यूम करत, नाचण्यासाठी हात वर केला. तसा एकीचा हात ओठांजवळ गेला आणि तीने करकचून शिट्टी मारली. सगळ्या जणी तिच्या पुरुषी बाजाकडे बघतच राहिल्या, तशी तिने सगळ्यांना भानावर आणण्यासाठी, लगोलग दुसरी शिट्टी वाजवली आणि आपणही नाचण्यासाठी हात उंचावला. हौशी बायका उठून गर्दीत तेवढ्यातल्या तेवढ्या जागेत नाचू लागल्या, तर बाकीच्या जणी टाळ्यांनी ताल धरू लागल्या. आज एकीनेही मोबाईलमध्ये डोकं खुपसलं नव्हतं. कारण, मोबाईलपेक्षा चांगलं मनोरंजन प्रत्यक्ष सुरू होतं. सगळ्याच जणींच्या चेहऱ्यावर त्यांचा आंनद प्रतिबिंबित होत होता.

नाचून, गाऊन मंडळी थोडी दमली, तर एकीने भेंड्यांची टूम काढली. मात्र, आज भेंड्या गाण्यांच्या नाही, तर शिव्यांच्या भेंड्या रंगणार होत्या. भेंड्यांचा हा अभिनव प्रकार ऐकला, तेव्हा गंमत वाटली, पण हा खेळ किती वेळ रंगेल ह्याबद्दलही थोडी शंका वाटली. मात्र, बायकांनी शंका खोटी ठरवली. एकापेक्षा एक इरसाल शिव्या त्यांच्या सुमुखातून बाहेर येत होत्या. रोज दिसणाऱ्या सभ्य चेहऱ्यांनी, असभ्य भाषेत केलेली पीएच.डी पाहून बघ्यांच्या भुवया उंचावत होत्या. मात्र भेंड्या खेळणाऱ्यांमध्ये सरस शिव्या देण्याची चुरस लागली होती.

एरव्ही, भांडणात कोणी एखादी शिवी हासडली, तरी बायकांची तळपायाची आग मस्तकात जाते आणि त्या होलिका मातेचं रूप घेतात. मात्र आज एकेका शिवीबरोबर सगळ्या जणी पोट धरून हसत होत्या. गडबडा लोळत होत्या. त्यातली एक जण तर, गाण्याचा ठेका थांबला, तरी ट्रेनच्या ठेक्यावर डुलत होती. तिला बहुदा त्या प्रसंगाची खरी झिंग चढली असावी. पाहता पाहता, शिव्यांचा पुरवठा संपला. प्रवासही मध्यावर आला होता. आणखी अर्ध्या तासात सगळ्या जणी मार्गस्थ होणार होत्या.

नाचून, गाऊन, हसून, बोलून सगळ्यांना भूक लागली. त्यांच्यातल्या एका काकूंनी रेडिमेड पुरण पोळीची पाकिटं उघडली आणि परवा येताना आपण तयार केलेल्या पुरणपोळ्या आणण्याचं प्रॉमिसही केलं. तळहातावर पुरणपोळी घेऊन सगळ्यांनी खायला सुरुवात केली. हात आणि तोंड खाण्यात व्यस्त असल्याने माहोल थोडा वेळ शांत झाला. एक पुरणपोळी पोटात गेल्यावर गप्पांना सुरुवात झाली. ‘आमच्याकडची होळी, तुमच्याकडचा शिमगा’ असा विषय रंगत गावगप्पा सुरू झाल्या. गप्पांच्या ओघात चेहरा पूर्ववत करण्याचे काम सुरू होते. तरी प्रत्येकीच्या गालावर हलकीशी लाली राहिली होती, जी अधिकच खुलून दिसत होती. उतरण्याची वेळ जवळ आली, तशी ब्लूटूथ स्पीकर वालीने समारोपाचं गाणं लावलं, ‘झालंय झिंग झिंग झिंग झिंग, झिंग झिंग झिंगाट’, कानावर गाणं पडलं मात्र, सगळ्या जणी बॅगा सीटवर ठेवून नाचायला उठल्या. अशातच नाचता नाचता चुकून एका मॉडर्न मुलीला धक्का लागला, तसा तिने नाचणाऱ्या मुलीच्या खांद्याला हिसका देत, ‘यू स्टुपिड’ म्हणत तिचा उद्धार केला. मग काय विचारता, नुकताच शिव्यांचा सराव झालेला, सगळ्या जणींनी एकासुराने तिला शिव्यांची लाखोली वाहिली आणि तिच्या नावाने बो बो बो बोssss म्हणत, होळीबरोबरच शिमगाही साजरा केला.

एकूणच आजचा प्रवास फारच रंगीत झाला. तसा तो नेहमीच होतो. फरक एवढाच असतो, की होळी एक दिवस असते आणि शिमगा रोजचाच असतो!

होळी आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा.