घर आणि कार लोन महागण्याची शक्यता

सामना ऑनलाईन । मुंबई

येत्या मार्च आणि एप्रिलच्या काळात तारण (मॉरगेज) आणि कार लोन वाढण्याची शक्यता आहे. ग्राहकांनी अधिक गुंतवणूक करावी तसेच उच्च दराच्या ठेवींमध्ये वाढ व्हावी या हेतूने कर्जांवरील व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे. तसंच, १ एप्रिलपासून निधीवर आधारित कर्ज दर (एमसीएलआर) च्या सीमान्त दराने बेस रेटला जोडण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय लागू होणार आहे. त्यामुळे चार वर्षांनंतर व्याजदर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या धोरणाचा फायदा बँका उचलणार आहेत.

आर्थिक चलनवलनासाठी बँका बाजारातून कर्ज घेतात. सध्या या कर्जांचे दर चढे आहेत. त्या तुलनेने वेगवेगळ्या कर्जांचे दर कमी असल्यामुळे बँकांवर आर्थिक दबाव वाढला आहे. तसंच बँकांकडून कर्ज घेण्याचे प्रमाणही वाढत असल्यामुळे कर्जावर व्याजदर वाढवल्यास त्याचा थेट फायदा बँकांना होणार आहे. तसंच अनेक ग्राहक बँकांमध्ये उच्च दराच्या ठेवींचीही गुंतवणूक करत आहेत. त्याचाही थेट फायदा बँकाना होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चलनवाढीची स्थिती तशीच राहिली तर आगामी काळात ठेवींच आणि कर्जावरील व्याजदर चढे राहतील, असं मत अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.