घर घ्यायला मदत करेल तुमची कुंंडली

anupriya-desai-astrologer>>अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तू विशारद)

मुंबईत घर घेणं अनेकांच स्वप्न. बँकेकडून कर्ज मिळणं,घराचा ताबा वेळेवर मिळणं अशा दिव्यातून जावं लागतं. ह्याच दिव्यातून माझ्या एका मैत्रिणीला जावं लागलं. नवऱ्याचा स्वतःचा व्यवसाय. त्यामुळे बँकेतून कर्ज मिळणे सोपे मुळीच नव्हते. एकत्र कुटुंबपद्धतीत राहतांना होणाऱ्या त्रासाचा मुलांवर होणारा परिणाम बघून तिने नवीन घर घेण्याचा निर्णय घेतला. तब्बल सहा वर्षांनी तिच्या प्रयत्नांना यश आले. हा तिचा प्रवास मला जवळून पाहता आला. तिचा हा प्रवास आणि कुंडलीतील घराचे योग ह्यावरील आजचा ब्लॉग आहे.

२०११ च्या सप्टेंबरमध्ये एका मॉलमध्ये माझ्या बालमैत्रीणीची भेट झाली. शाळेचे शिक्षण झाल्यानंतर आम्ही दोघींनी वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये प्रवेश घेतला आणि मग आमचा फार संपर्क राहिला नाही. त्यांनतर मॉलमध्येच भेट. काय गं? कुठे असतेस? पतीदेव काय करतात? मुलं किती ह्या सर्व प्रश्नोत्तरांनंतर मॅडमने नोकरीचा प्रश्न केलाच. कुठे जॉब करतेस गं? “आधीपासूनच असलेली ज्योतिषाची आवड सध्या माझी ओळख आहे. ज्योतिष आणि वास्तू संदर्भात लोकांना मार्गदर्शन करतेय.” हे ऐकल्यावर तिच्या चेहेऱ्यावरचा आश्चर्ययुक्त आनंद लक्षणीय होता. मग फोन नंबर exchange झाले. भेटू लवकरच म्हणत तिचा निरोप घेतला.

त्याच्या पुढच्याच आठवड्यात मॅडमचा फोन आला भेटीचा दिवस ठरला आणि मॅडम घरी अवतरल्या. सगळ्या गप्पा झाल्यांनतर विषय आला स्वतःच्या घराबद्दल. मुंबईत स्वतःचे घर असणे किती गरजेचे आहे ह्यावर भरपूर चर्चा झाली. ह्या चर्चेच्या शेवटी तिला म्हणाले,” हे बघ बाई मुंबईत स्वतःचे घर असण्याची इच्छा असणे आणि प्रत्यक्षात ते विकत घेणे ह्यात फरक आहे. तुम्ही प्रयत्न करत रहा.” त्यावर तिचे उत्तर,”अगं तूच का नाही पत्रिका बघून सांगत? आमच्या पत्रिकेत योग कधी आहेत ते तू सांग म्हणजे आमच्याही प्रयत्नांना उभारी येईल.”

तिची आणि तिच्या नवऱ्याची पत्रिका व्यवस्थित अभ्यासल्यानंतर तिला म्हणाले,” पहिली चांगली बातमी ही आहे की तुम्ही स्वतःचे घर घेऊ शकता आणि दुसरी चांगाली बातमी म्हणजे घर होईल ते मुंबईतच. घराच्या बाजूला मुख्यत्वे मॉल असेल”. तिचा पुढचा अपेक्षित प्रश्न,” कधी होईल घर? कुठल्या वर्षी हे सांगशील का ?” “घर घेण्याचे ४०% योग आहेत ते ही २०१४ सप्टेंबरला. म्हणजे सप्टेंबर २०१४ ला तुझे स्वतःचे घर असू शकेल परंतु ४०टक्केच योग आहेत आणि जर का काही कारणास्तव २०१४ ला घर घेऊ शकला नाहीत तर २०१६ची दिवाळी मात्र तू स्वतःच्या घरात नक्की साजरी करशील.” हे ऐकून तिचा जरा हिरमोड झाला. बहुदा तिला नजीकच्या काळात घराचे योग असावेत अशी अपेक्षा होती. तिला म्हणाले,” हे बघ योग तर २०१६चे जास्त योग्य वाटतं आहेत परंतु तुम्ही आत्तापासूनच प्रयत्न करा.” “तसं नाही गं. आम्ही ह्या आधी एका ज्योतिषांना पत्रिका दाखवली होती. त्यांनी तर १०० टक्के गॅरंटी दिली आहे की सप्टेंबर २०१४ ला आम्ही स्वतःच्या घरी असणार. आता तू म्हणतेस की २०१४ ला योग आहेत परंतु पत्रिका फार समाधानकारक नाही. २०१६ ला घर म्हणजे खूप उशीर नाही का गं वाटत?” ह्या वर मी काहीच उत्तर दिले नाही कारण ह्या सर्व योगायोगाच्या गोष्टी आहेत. तेंव्हा काळच त्याच उत्तर देईल.

त्यानंतर तिचे नेहेमी फोन यायचे. घाटकोपर,पवई,विक्रोळी,भांडुप, कांजूरमार्ग ही सर्व ठिकाणं पालथी घालून झाली परंतु कुठे घराची किंमत पटली नाही तर कुठे मुलांची शाळाच लांब, कुठे बाजारपेठ दूर म्हणून नको. करताकरता २०१४ ऑगस्ट उजाडला. तिचा फोन न आला तरच नवल. “अगं अनुप्रिया अजून कुठेही घर बुक केलं नाहीये. ऑगस्ट आला.” तिला पुन्हा पाढा वाचून दाखवला. त्यानंतर त्याच आठवड्यात तिने मला फोन केला. घाटकोपरला एक फ्लॅट त्यांना आवडला होता त्यांनी तो बुकही केला. खूप खुश होती तेंव्हा ती. चला मुंबईत स्वतःचा फ्लॅट झाला बुवा एकदाचा. तिचे स्वप्न पूर्ण झाले.

तिचे अभिनंदन केले आणि मी कामाला लागले कारण २०१६ला घर घेऊ शकशील असे भविष्य मी वर्तविले होते. ज्या ज्योतिषांनी तिला २०१४ नक्की स्वतःच्या घरी रहायला जाशील असे सांगितले होते त्यांना मनोमन नमस्कार केला. कदाचित ज्ञान आणि अनुभव ह्यात मी कमी पडले असा विचार करून तिची आणि तिच्या नवऱ्याची पत्रिका पुन्हा अभ्यासली. पुन्हा तेच. मला २०१६ चाच घर घेण्याचा योग दिसत होता. ही काय गोम आहे ते कळेच ना.

त्यानंतर सतत माझ्या डोक्यात हेच विचार की कुठे आपले गणित चुकले? ह्याचे उत्तर मिळाले पाहिजे. ह्याचे उत्तर दिले तिनेच. तिचा फोन पुढच्याच आठवड्यात आला हे सांगण्यासाठी की त्यांनी घराचे बुकिंग रद्द केले आहे. बँकेने लोन पास केले नाही त्यामुळे पुढचे पैसे भरता येणं शक्य नव्हतं. सध्या घरी पैशांची चणचण आहे त्यामुळे मग काही पर्यायच उरला नाही. तिला शब्दांनी उभारी दिली आणि २०१६ची आठवण करून दिली.

२०१५ ह्या संपूर्ण सालात तिने स्वतःला घर शोधण्यासाठी वाहून घेतलं. आता तिचा ज्योतिष आणि वास्तूवरचा विश्वास वाढला होता. त्यामुळे ह्या वेळेस मॅडम वास्तूच्या नियमांप्रमाणेच घर घेण्यासाठी हट्टाला पेटल्या होत्या. सरतासारता २०१५ साल सरले. २०१६ जानेवारी आला. तिची काळजीयुक्त विचारणा सुरूच होती,”होईल ना गं घर ह्यावेळेस नक्की?” आता मुलं मोठी होत आहेत. एकाच घरात आम्ही तीन कुटुंब एकत्र राहतोय. पण आता कठीण दिसतंय एकत्र राहणं. मुलांना त्यांची स्पेस हवी गं”. मी उत्तर देणे टाळले. आता वाट बघण्याशिवाय पर्याय नाही.

फेब्रुवारीमध्ये तिने मला एक वास्तू आवडल्याचे सांगितले. “अगं अनुप्रिया मला मुलुंडला एक वास्तू आवडली आहे. आमच्या बजेटमध्ये आहे. बँकेनेही लोन मंजूर केलंय आणि मुख्य म्हणजे तुझ्या वास्तूच्या नियमांप्रमाणे आहे. परंतु घर बुक करण्याआधी तू जरा तुझ्या पद्धतीने तपासशील का ?” “अगं त्यांत काय एवढं येईन मी. मला पत्ता दे आपण ह्या गुरुवारीच भेटू.” गुरुवारची भेट नक्की झाली आणि आम्ही घरात पाऊल ठेवले. घरात प्रवेश करताच अत्यंत Positive Energy जाणवली. समोरच मोठी बैठकीची खोली, नंतर स्वयंपाकघर, त्यापुढे मुलांची खोली आणि सर्वात शेवटी मास्टर बेडरूम. सर्व खोल्या ऐसपैस. जुने बांधकाम त्यामुळे सर्व खोल्यांना न्याय मिळालेला. ( नाहीतर आताची बांधकाम. चार पावलं घरात टाकली की बैठकीची खोली झाली. बेडरूममध्ये एक बेड आला की वावरण्याचीही मुभा नाही. स्वयंपाकघराचं तर काय विचारू नका. पॅसेजमध्ये स्वयंपाक घर असतं हल्ली. अशी लहान घर पाहिली की मला मुन्ना भाई ह्या फिल्मचा संवाद आठवतो मला – “अरे ये घर तो सुरू होते ही खतम हो गया”. मुंबईत घरं अशीच असतात. इलाज नाही. असो.)

तिला जसे हवे तसे घर मिळाले. वास्तूच्या नियमांमध्ये सर्व काही बसले. सर्व नक्की झाल्यावर खाली आलो आणि समोर साक्षात मुलुंडचा निर्मल लाईफस्टाईल मॉल. मी काही बोलण्याआधीच ती म्हणाली,”बघ समोरच मॉल आहे. तू म्हणाली होतीस ना की घराच्या बाजूलाच मॉल असेल. हा बघ. आणि D- Mart ही बाजूलाच आहे. घर २०१६लाच होणार हे तर सांगितलेच होतेस त्याच बरोबर घर मुंबईतच होईल आणि घराच्या बाजूला मॉल ह्याही गोष्टी तंतोतंत जुळत आहेत. थँक्स अनुप्रिया. झाले गं घर. खूप वाट पाहायला लावली ह्या योगाने. घर पाहावे बांधून म्हणतात त्याचीच प्रचीती आली सहा वर्षात.”

तिचे अभिनंदन करून खूपखूप शुभेच्छा दिल्या आणि ज्योतिष शास्त्राला मनोमन प्रणाम केला.

आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा: [email protected]

  • Manus Ki

    हे हे हे . ही हि हि. खी खी खी. मुंबईला पूल हादसा झाला. त्यात मेलेल्याची कुंडली काय म्हणत होती. जेल मध्ये टाकायला पाहिजे तुमच्या सारख्या लोकाना.