जीएसटीमुळे घरपोच रेल्वे पास सेवा बंद

सामना प्रतिनिधी, मुंबई

उपनगरीय लोकलमधून दररोज ७५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करीत असतात; परंतु यात रेल्वे पासधारकांची संख्या अचानक वाढली आहे. असे असताना तिकीट खिडक्यांवर होणारी गर्दी कमी करण्यासाठी गेले अनेक वर्षे आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरही रेल्वेचे पास ऑनलाइन बुक करून ती घरपोच देण्याची सोय सुरू होती. वस्तू व सेवा कराच्या अंमलबजावणीनंतर ही सेवा अचानक परवडत नसल्याचे कारण देऊन बंद करण्यात आल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.

रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर तिकिटांसाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगा पाहून आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरूनही रेल्वेचे फर्स्ट आणि सेकंड क्लासचे पास ऑनलाइन विकत मिळण्याची सुविधा आयआरसीटीसीने गेल्या चार ते पाच वर्षांपासून सुरू केली होती. या सुविधेत पासाचे पैसे ऑनलाइन डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे कापले जात होते. त्यानंतर रेल्वे प्रशासन प्रवाशांना घरपोच रेल्वे पास पाठवीत असल्याने ही सेवा फायद्याची होती. त्यामुळे प्रवाशांचे रांगेत उभे राहण्याचे कष्ट वाचत होते. मात्र जीएसटी लागू झाल्यानंतर मात्र ही सेवा आयआरसीटीसीने अचानक बंद केली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.