शाहीद आफ्रिदीच्या कश्मीर वक्तव्यावर राजनाथ सिंहांची प्रतिक्रिया

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

“शाहीद आफ्रिदी योग्यच बोलला, ते पाकिस्तान सांभाळूशकत नाहीत, तर कश्मीर काय सांभाळणार. कश्मीर हा हिंदुस्थानचा हिस्सा होता, आहे आणि कायम राहणार” अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. लंडनमध्ये एका पत्रकार परिषदेत शाहीद आफ्रिदीने “पाकिस्तान स्वतःच्या देशातील चार प्रांत सांभाळू शकत नाही, मग कश्मीर काय सांभाळणार”, असे विधान केले होते.

पाकिस्तानला घरचा आहेर देणाऱ्या शाहीद आफ्रिदीने काही वेळातच युटर्न घेत आपले विधान काटछाट करून हिंदुस्थानी प्रसारमाध्यमांनी दाखवल्याचा आकांततांडव केला. आफ्रिदीने ट्विटरवरून हिंदुस्थानी प्रसारमाध्यमांवर आगपाखड केली आहे. माझ्या संभाषणाची क्लीप अर्धवट दाखवली आहे, मला माझ्या देशाचा आणि कश्मीरींच्या लढ्याचा सार्थ अभिमान आहे. किमान माणुसकीच्या नात्याने त्यांना त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे असे आफ्रिदीने त्याच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.