मुंबईत होमगार्डचे मनुष्यबळ वाढणार

9


सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईत होमगार्डचे मुनष्यबळ आता वाढणार आहे. सद्यस्थितीला शहरात होमगार्डची संख्या अडीच हजारांवर असून हे मनुष्यबळ कामाच्या तुलनेने फारच कमी पडत आहे. त्यामुळे लवकरच होमगार्डचे मनुष्यबळ दुप्पट करण्याचा निर्णय होमगार्ड विभागाने घेतला असून यामुळे सुरक्षा यंत्रणांचे हात अधिक बळकट करण्यास मदत मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्यात सध्या ४० हजार होमगार्डची संख्या आहे, तर मुंबईत केवळ अडीच हजार होमगार्ड कार्यरत आहे. मुंबईचा आवाका आणि सुरक्षा यंत्रणांना होमगार्डची नेहमीच आवश्यकता भासते. गेल्या अनेक वर्षांत होमगार्डची म्हणावी तशी भरतीच करण्यात आली नव्हती. मागील दोन वर्षांपासून हळूहळू होमगार्ड सदस्य नोंदणी सुरू करण्यात आली, परंतु आता होमगार्डचे मनुष्यबळ दुपटीने करण्यात येणार आहे. म्हणजेच आणखी अडीच हजार होमगार्डची भरती करून मुंबईतील होमगार्डची संख्या पाच हजार करण्याचा निर्णय होमगार्ड विभागाने घेतला आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दहावी उत्तीर्ण असलेले तसेच २० ते ५० वयोगटातील उमेदवारांना या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

मागणी केल्यास पुरवठा करू
शहरातील कायदा व सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्याबरोबर रेल्वे हद्दीत काम करताना बऱयाचदा पोलिसांचे मनुष्यबळ कमी पडते. अशा वेळी सोबतीला होमगार्डची मदत घेतली जाते. आता होमगार्डचे मनुष्यबळ पाच हजार इतके करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या सुरक्षा यंत्रणांना होमगार्डची मदत हवी असेल त्यांनी तशी मागणी करावी, आवश्यक मनुष्यबळ पुरवले जाईल असे ते अधिकारी म्हणाले.

बेरोजगारांना रोजगाराची संधी
दहावी उत्तीर्ण असलेले आणि २० ते ५० वयोगटात मोडणारे पण बेरोजगार असणाऱ्यांसाठी रोजगाराची ही उत्तम संधी आहे. जे उमेदवार पात्र ठरत असतील त्यांनी होमगार्ड भरतीमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन होमगार्ड विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

शहरातील होमगार्डचे मनुष्यबळ पाहता ते तुटपुंजे आहे. त्यामुळे आम्ही होमगार्ड भरती करणार आहोत. जीआरपी तसेच अन्य सुरक्षा यंत्रणांकडून होमगार्डची मागणी होत आहे. त्यामुळे लवकरच होमगार्डची मेगा भरती करण्यात येणार आहे.
– संजय पांडे, महासंचालक (होमगार्ड)

आपली प्रतिक्रिया द्या