PARTNER: गिरिजा जोशी – चिन्मय उद्गीरकर

191

मधुचंद्र म्हणजे?
– एकमेकांना क्वॉलिटी टाईम देणं म्हणजे माझ्यासाठी मधुचंद्र.
फिरायला जाण्याचे प्लॅनिंग कसे केले होते?
– आम्ही इंडोनेशिया – बालीला गेलो होतो. सगळं प्लॅनिंग मीच केलं होतं. हिंदुस्थानच्या बाहेर कुठेतरी फिरायला जायचे होते. त्यात दोघांनाही निसर्ग आवडतो. त्यामुळे बालीला जाण्याचे ठरवले.
तिथे आवडलेले ठिकाण?
– बाली. ते इतकं सुंदर आहे की, ते पाहून डोळय़ांचे पारणे फिटून जाते. तिथले कॉफीचे मळे खूप सुंदर आहेत. आम्ही पावसाळय़ात फिरायला गेलो असल्याने सगळीकडे निसर्गाने हिरवी चादर पांघरल्यासारखं वाटत होते.
ठिकाणाचे वर्णन?
– ज्यांना गोवा, कोकण आवडतं, निसर्गात रमायला आवडतं. त्यांनी नक्कीच बालीला जावे. अगदी कोकणात आल्यासारखे वाटते.
तिथली आठवण?
– मी पूर्णपणे शाकाहारी आणि चिन्मय मांसाहारी. त्यामुळे कुठेही गेल्यावर माझे खूपच प्रॉब्लेम व्हायचे. त्यांच्या जेवणात अंडे तर असायचेच. त्यावेळी चिन्मय माझी गंमत करण्यासाठी तो माझ्यासाठी नूडल्स घेऊन आला आणि त्यात पनीर असल्याचे त्याने सांगितले, पण मला कळले होते ते अंडं आहे. तो माझी गंमत करत होता. .
आवडलेला खाद्य पदार्थ?
– तिथे मला खोबऱयाचे डेझर्ट आवडलं होतं.
अनोळखी ठिकाणी की रोमॅण्टिसिझम? –
रोमॅन्टिसिझम. ठिकाण कोणतेही चालतं, पण रोमॅन्टिसिझम पाहिजेच. आवडीच्या माणसासोबत कुठेही चालते. त्यावेळी ठिकाण महत्वाचे नसते. फक्त सोबत तो हवा असतो.
मधुचंद्र हवाच की? –
हवाचं. एकमेकांना समजून घेण्यासाठी मधुचंद्र हवाच. पण आजच्या धावपळीच्या युगात निवांत वेळ घालविण्यासाठी प्रत्येक जोडप्याने वर्षातून एकदा तरी फिरायला जायला हवं. कारण अलिकडे व्यस्त जीवनशैलीमुळे संवाद कमी होत चालला आहे.
एकमेकांशी नव्याने ओळख?
एकमेकांना वर्षभर ओळखत असल्याने नव्याने अशी ओळख नव्हतीच. पण लग्न झाल्यावर पहिले काही महिने चिन्मय डेली सोपमध्ये व्यस्त होता. त्यामुळे हवा तेवढा त्याला वेळ देता येत नव्हता, पण तरीही वेळ काढायचा. डेली सोप असल्यामुळे त्याच्या कामाची कसरत मला माहीत होती.
एकमेकांना ओळखण्यासाठी किती दिवस द्यावेत –
मला असं वाटतं, पहिले एक-दोन महिने आपण एकमेकांच्या सवयी ओळखत असतो. एकमेकांना इप्रेस करण्याचा प्रयत्न करत असतो. काही अंतराने आपल्याला एकमेकांचे खरे स्वभाव कळतात. त्यामुळे एकमेकांना ओळखण्यासाठी सहा महिने तरी घ्यावेत.
तिथे केलेली शॉपिंग? –
तिथे मी एक नोटबुक घेतली होती. ती नोटबुक झाडाच्या पानांनी बनवलेली होती. तसेच लाकडाचे पेन घेतले होते ते आजही जपून ठेवले आहे. तसेच ज्युटच्या पर्सेस घेतल्या होत्या.
आठवणीतला प्रसंग? –
आम्ही तिथे असताना व्होल्कॅनो इरप्शन झालं होतं. त्यामुळे एअरपोर्ट दोन-तीन दिवस बंद होतं तिथे प्रचंड धूर होता. अशा वेळी चिन्मयच्या काकूने इंडोनेशियाच्या टोकाला असलेल्या सुराबाया येथून गाडी पाठवली होती. चौदा तासांचा प्रवास करून आम्ही तिथे गेलो होतो. तिथे तीन दिवस राहिलो. त्यानिमित्ताने आणखी एक ठिकाण आम्हाला पाहता आलं. खूप छान वाटलं होतं. त्याची काकू तिथे असल्यामुळे अन्य प्रवाशांसारखी आमची गैरसोय झाली नाही.
लग्नानंतरचा संसारातील जोडीदार? –
खूप चांगला आणि समजूतदार आहे. तो माझ्यासाठी टिपिकल नवरा नसून चांगला मित्र आहे. खूप शांत आहे. कधी त्याला माझ्यासाठी वेळ देता आला नाही तर तो समजून घेऊन लवकर आल्यावर बाहेर घेऊन जातो. नवरा-बायकोच्या पलीकडचे नाते आहे. आम्ही चांगले पार्टनर आहोत. आमचा मजबूत बॉण्ड आहे.

आपली प्रतिक्रिया द्या