हॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन ;प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत

सामना ऑनलाईन,कावलून
हॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन  स्पर्धेत हिंदुस्थानच्या  किदाम्बी  श्रीकांतने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली. त्याने उप-उपांत्यपूर्व फेरीत आपल्याच देशाच्या  एच एस प्रणॉयला १८-२१, ३०-२९, २१-१८ असे पराभूत केले. पहिला गेम  श्रीकांतला गमवावा लागला. मात्र त्याने चांगलीच झुंज दिली. पण तीन गुणांच्या फरकाने गेम प्रणॉयच्या नावावर झाला. दुसऱ्या गेममध्ये कमालीची चुरस पाहायला मिळाली. हा गेम हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढतच गेला. अखेर ३०-२९ अशा गुणसंख्येवर श्रीकांतने तो गेम जिंकला आणि सामन्यात बरोबरी राखली. तिसरा गेमदेखील अटीतटीचा झाला. या गेममध्ये पहिल्या गेमची पुनरावृत्ती झाली. फक्त हा गेम प्रणॉय ऐवजी श्रीकांतने जिंकला आणि प्रणॉयला घरचा रस्ता दाखवला.
काल झालेल्या सामन्यांमध्ये हिंदुस्थानची स्टार खेळाडू  सायना नेहवाल हिला सलामीच्याच सामन्यात गाशा गुंडाळावा लागला. जपानच्या अकाने यामागूची हिने सायनाला २१-१०, १०-२१, १९-२१ असे पराभूत केले. याच स्पर्धेत आधी झालेल्या सामन्यात पी व्ही सिंधूने विजयी सलामी दिली. तृतीय मानांकित पी. व्ही. सिंधूने थायलंडच्या नीचाऑन जिंदापॉल हिला २१-१५, १३-२१, २१-१७ असे पराभूत केले. तर पुरुष एकेरीच्या गटात स्विस आणि हैदराबाद खुल्या बॅडमिंटन स्पर्धांचे विजेतेपद पटकावणाऱ्या समीर वर्मा यानेही विजयी सलामी दिली. त्याने थायलंडच्या सुपान्यू अविहींग्सनॉन याचा पराभव केला होता.