चंद्रपुरात ‘सैराट’, मुलीच्या वडिलांनी व भावाने केली प्रियकराची निर्घृण हत्या

1

सामना प्रतिनिधी । चंद्रपूर

राज्यामध्ये सैराट हत्याकांड सुरुच असून ताजी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस परिसरामध्ये घडली आहे. येथे मुलीच्या वडिलांनी आणि भावाने प्रियकराची बेदम मारहाण करून निर्घृण हत्या केली. याप्रकरणी आरोपींनी पोलिसांपुढे शरणागती पत्करली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक योगेश जाधव (23) या तरुणाचे प्रभूदास धुर्वे यांच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. याचा माहिती मिळाल्यानंतर मुलीच्या प्रियकराला पिता-पुत्राने बेदम मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झाला. मृतक योगेश जाधव हा 12 मे पासून बेपत्ता होता. सोमवारी 13 मे रोजी यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील निलजई खाण परिसरात जंगलात योगेशचा मृतदेह सापडला.

दरम्यान, ट्रॅक्टरमालक असलेल्या प्रभूदास धुर्वे आणि पुत्र कृष्णा धुर्वे यांनी योगेशची हत्या केल्यावर पोलिसांपुढे शरणागती पत्करली. या प्रकरणी सिरपूर आणि घुग्गुस पोलीस अधिक तपास करत असून या हत्येमागे आणखी कोणते कारण आहे का याचाही तपास सुरू आहे.