हुक्का पार्लर ‘कोटपा’मध्ये आणणार

सामना ऑनलाईन । मुंबई

राज्यात हुक्का पार्लरमध्ये होत असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाला चाप लावण्यासाठी हुक्का पार्लरलाही सिगारेट आणि तंबाखू उत्पादने अधिनियम म्हणजे ‘कोटपा’अंतर्गत आणले जाणार आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली.

मद्यपान, धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन वाढत आहे. याप्रकरणी कडक कायदा करावा अशी मागणी सदस्य प्रकाश गजभिये यांनी अल्पकालीन चर्चेद्वारे केली. या चर्चेला उत्तर देताना गृहराज्यमंत्री रणजित पाटील म्हणाले, हुक्का पार्लरमध्ये तरुणाईकडून अमली पदार्थांचे सेवन होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अमली पदार्थांच्या सेवनाविरोधात कडक कायदा व्हावा आणि जास्त शिक्षा व्हावी यासाठी हुक्का पार्लरला ‘कोटपा’अंतर्गत घेऊ. त्यासाठी दोन्ही सभागृहांची परवानगी घेऊन केंद्राकडे शिफारस करू.

महिलांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढत असून गडचिरोलीमध्ये ते सर्वाधिक आहे, असे डॉ. दीपक सावंत म्हणाले. तंबाखूमुक्तीसाठी ३४ जिल्ह्यांमध्ये तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची आखणी केल्यानंतर २३९ व्यसनमुक्ती केंद्रांच्या माध्यमातून १ लाख ४१ हजार ६७१ लोकांचे समुपदेशन करण्यात आले. त्यापैकी दहा हजार लोकांनी तंबाखू खाणे सोडले तर सात हजार शाळा तंबाखूमुक्त झाल्या. तंबाखू खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणारा मग तो रिक्षावाला असेल किंवा मर्सिडीजमधील व्यक्ती असेल यांना जरब बसेल अशा शिक्षेची कायद्यात तरतूद करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ई-सिगारेटवर बंदी गरजेची – डॉ. दीपक सावंत
आरोग्य खात्याने घेतलेल्या १ ते ३१ डिसेंबरदरम्यान घेतलेल्या एका सर्वेक्षणात २ कोटी १९ लाख लोकांनी सहभाग घेतला. त्यामध्ये दहा टक्के लोक मौखिक तपासणीत संशयित आढळले आहेत. त्यातील एक टक्के म्हणजे २० हजार लोक कॅन्सरपीडित असल्याची शक्यता आहे असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी चर्चेला उत्तर देताना सांगितले. ई-सिगारेट सगळ्यात घातक असून त्यावर बंदी आणणे गरजेचे असल्याचे सांगत तंबाखू आणि सिगारेटचे दुष्परिणाम दर्शवणाऱया जाहिराती अधिक प्रभाववाली आणि कल्पक करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.