आठवड्याचे भविष्य – २० मे ते २६ मे २०१८

>> नीलिमा प्रधान

मेष – प्रभाव वाढेल
राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुम्ही ज्यांना आदर्श मानता त्यांनी कोणती खेळी खेळली म्हणून ते पुढे गेले याचा विचार करा. तुमचा प्रभाव सर्वत्र वाढेल. लोकांच्या अपेक्षा तुमच्याकडून वाढतील. वादाचे व तणावाचे प्रसंग तात्पुरते येतील. कौटुंबिक जबाबदारी पूर्ण करू शकाल. कला-क्रीडा क्षेत्रांत आर्थिक लाभ मिळेल. शुभ दि. २२, २३

वृषभ – महत्त्वाचा निर्णय घ्याल
राजकीय-सामाजिक क्षेत्रांत स्वतःच्या चुकीचे समर्थन करण्यापेक्षा ती सुधारण्यात वेळ व बुद्धी खर्च करा. या आठवडय़ात महत्त्वाचा निर्णय घेता येईल. वरिष्ठांची मदत मिळेल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. कुटुंबातील वादाचे कारण दोघांनी शोधल्यास मार्ग निघू शकतो. कलाक्षेत्रात विचारांना चालना मिळेल. शुभ दि. २१, २४

मिथुन – निर्णयात सावधगिरी बाळगा
क्षेत्र कोणतेही असो तुम्ही सावधपणे निर्णय घ्या. मन खंबीर राहील, पण आपण चूकच करणार नाही या भ्रमात राहू नका. आज न दिसणारी चूक उद्या महागात पडेल याचे भान राजकारणात जरूर ठेवा. सामाजिक कार्यात लोकांची आपुलकी मिळेल. प्रामाणिक माणसाला चूक केली नाही हे सिद्ध करणे फारच कठीण असते. शुभ दि. २१, २२

कर्क – वर्चस्व वाढेल
कुटुंबात चहाच्या पेल्यातील वादळ निर्माण होईल. जवळच्या व्यक्तींच्या हृदयाला लागेल असे भाष्य करण्याची चूक होऊ शकते. राजकीय-सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढेल. व्यवसायात काम मिळेल. कामगारवर्गाची व्यथा समजून घ्या. कला क्षेत्रात तुमची कल्पना पटवून देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. शुभ दि. २२, २३

सिंह – कामाचे अवलोकन करा
आठवडय़ाच्या सुरुवातीला विरोधकांचा दबाव राहील. राजकीय-सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाचे अवलोकन केल्यास अधिक चांगल्या वेगाने यशाचे शिखर गाठता येईल. प्रतिष्ठा व आर्थिक लाभ मिळेल. तुमच्या कार्याचे कौतुक होईल. कलाक्षेत्रांत चांगले काम होईल. परदेशगमनाची संधी मिळेल. शुभ दि. २४, २५

कन्या – चूक सुधारण्याची संधी मिळेल
तुमच्या कार्यातील अडसर दूर होईल. नोकरीत वरिष्ठ खूश होतील. चांगला बदल करता येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत नकळत झालेली चूक स्वतःच्या मनाला समजलेली असते. ती चूक सुधारण्याची मोठी संधी मिळेल. व्यवसायात करार करण्याची घाई नको. लोकसंग्रह वाढवा. स्वतःचे अस्तित्व वाढवता येईल. शुभ दि. २५, २६

तूळ – संयम बाळगा
राजकीय, सामाजिक क्षेत्रांत तुम्ही घेतलेला निर्णय चुकीचा ठरू शकतो किंवा त्या निर्णयाच्या मागे कोणता उद्देश आहे हे वरिष्ठांच्या लक्षात येणार नाही. वाद होईल. राग वाढेल. प्रतिष्ठा पणाला लावून भांडण करू नका. प्रवासात सावध करा. मौल्यवान वस्तू व कागदपत्रे सांभाळा. भ्रमात न राहता बुद्धीचा वापर करा. शुभ दि. २१,२२

वृश्चिक – कामावर लक्ष केंद्रित करा
कोणत्याही कामात दुसऱयावर अवलंबून न राहता स्वतः लक्ष द्या. दुसऱयाची चूक दाखवताना एक बोट समोर दाखवल्यावर चार बोटे आपल्याकडे दर्शवली जातात हे विसरू नका. जवळच्या माणसांना दुखवू नका. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत हे तत्त्व ध्यानात ठेवा. प्रतिष्ठा टिकवता येईल. शुभ दि. २१, २४

धनु – मनोबल राखा
स्वतःहून दुसऱयाची चूक दाखवण्याचा तुमचा स्वभाव नाही, परंतु न केलेली चूक तुमच्यावर लादली तर तुम्ही आक्रमक होता. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होईल. वरिष्ठांचे सहाय्य मिळणे कठीण होईल. इतरांची मर्जी राखावी लागेल. व्यवसायात सुधारणा होईल. नोकरीत वरिष्ठांचा दबाव राहील. शुभ दि. २२, २३

मकर – मनस्ताप होईल
तुमच्या निर्णयामध्ये चूक दाखवून जवळच्याच व्यक्ती तुम्हाला मनस्ताप देतील. संयम ठेवा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत वर्चस्व राहील. कठोर शब्दप्रयोग न करता तुमचे मुद्दे स्मित हृदयाने पटवून द्या. साडेसातीमध्ये माणसाला नव्याने शिकण्यास मिळते. त्याचा योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे. चूक सुधारण्याची संधी मिळेल. शुभ दि. २५, २६

कुंभ – कामाचा व्याप वाढेल
नोकरीत कामाचा व्याप वाढेल. वरिष्ठांची मर्जी पाहून बोलावे लागेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत योजना मार्गी लावताना चुकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पुढील काळातील दमदार यश मिळवण्यासाठी व विरोधकांच्या चुकीवर बोट ठेवण्यासाठी सज्ज व्हा. कामं वाढतील. तारेवरची कसरत करावी लागेल. शुभ दि. २२, २३

मीन – मतभेद होतील
कोणत्याही समस्येचा योग्य पद्धतीने पाठपुरावा केल्यास यश मिळवता येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत मतभेद होतील. तुम्हाला वरिष्ठांनी दिलेले आश्वासन पूर्ण होण्याची आशा वाटेल. सहकारी तुम्हाला मदत करतील. धंद्यात चांगला फायदा होईल. कला क्षेत्रात उत्साह वाढेल. विचारांना चालना मिळेल. शुभ दि. २१, २४