आठवड्याचे भविष्य – रविवार १७ ते शनिवार २३ जून २०१८

  • नीलिमा प्रधान

मेष – जवळचेच लोक आरोप करतील

सूर्य-चंद्र लाभयोग आणि शुक्र, मंगळ प्रतियुती होत आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात जवळचेच लोक तुमच्या डावपेचांचे महत्त्व कमी झाल्याचा आरोप करण्याची शक्यता गुरुवार, शुक्रवारी आहे. तुमच्या कार्याच्या कक्षा व्यापक होतील. कलावंतांना प्रसिद्धी मिळेल. व्यवसायात चांगली संधी मिळेल.
शुभ दिनांक :१८, १९.

वृषभ – कायदा पाळा

चंद्र-बुध लाभयोग व चंद्र-मंगळ त्रिकोणयोग होत आहे. याच आठवड्यात व्यवसाय, नोकरी अथवा तुमचे क्षेत्र यामधील महत्त्वाची कामे करून घ्या. कोर्ट प्रकरणात यश मिळविण्याची जिद्द ठेवा. कायदा पाळा. उलाढाली करून पुढे अडचणी वाढण्याची शक्यता आहे. चंचलपणा करू नका.
शुभ दिनांक : १७, २०.

मिथुन – कामांना गती मिळेल

चंद्र-शुक्र लाभयोग आणि बुध–नेपच्यून त्रिकोणयोग होत आहे. मनावरील दडपण कमी होईल. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. शेअर्समध्ये अंदाज बरोबर येईल. वरिष्ठांची नाराजी दूर होईल. गैरसमज संपवता येतील. मुलांच्या प्रगतीसंबंधी योग्य निर्णय घेता येईल. दर्जेदार लोकांचा परिचय होईल.
शुभ दिनांक : १८, १९.

कर्क – बोलताना भान ठेवा

शुक्र-शनी षडाष्टक योग आणि बुध-प्लुटो प्रतियुती होत आहे. क्षेत्र कोणतेही असो, सर्वच ठिकाणी तुम्हाला सावधपणे बोलावे लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात एखादा शब्द वणवा पेटवू शकतो. प्रतिष्ठा पणाला लावू नका. मेहनत व प्रेम यांचाच वापर करा. शब्द हे शस्त्र होतात याचे भान ठेवा.
शुभ दिनांक : १९, २०.

सिंह – विचारांना चालना मिळेल

चंद्र- बुध लाभयोग आणि सूर्य- चंद्र त्रिकोणयोग होत आहे. रविवारी मनावर दडपण राहील. नंतर मात्र तुमचे कार्य ठरवल्याप्रमाणे पूर्ण होईल. विचारांना आणि कार्याला चालना मिळेल. कुटुंबात जवळचे लोक नाराज होतील. व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळेल. मैत्रीत तणाव राहील.
शुभ दिनांक : २०, २१.

कन्या – मोठे कंत्राट मिळेल

बुध-गुरू त्रिकोणयोग आणि शुक्र-मंगळ प्रतियुती होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला मानसिक अस्थिरता वाढेल. राजकीय व सामाजिक क्षेत्रात बुद्धी आणि प्रतिष्ठेचा उपयोग करून ठरवलेल्या योजना मार्गी लावाल. संततीच्या प्रगतीसाठी मोठा निर्णय घ्यावा लागेल. व्यवसायात मोठे कंत्राट मिळेल.
शुभ दिनांक : २२, २३.

तूळ – मानसन्मान वाढेल

सूर्य-चंद्र लाभयोग आणि बुध-नेपच्यून त्रिकोणयोग होत आहे. क्षेत्र कोणतेही असो, आत्मविश्वासाने आणि उत्साहाने कार्य करता येईल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. नोकरीत पदाधिकारात वाढ होईल. मानसन्मान वाढेल. कोर्ट केस संपवा. बुधवार, गुरुवारी रागावर नियंत्रण ठेवा.
शुभ दिनांक : १७, १८.

वृश्चिक – उक्ती-कृती यांचा मेळ घाला
चंद्र-शुक्र लाभयोग आणि शुक्र-मंगळ प्रतियुती होत आहे. आठवडय़ाच्या शेवटी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात विरोधाचा सामना करावा लागेल. प्रतिष्ठsला धोका निर्माण होईल. तुमची उक्ती आणि कृती यात योग्य मेळ घाला. नोकरीत कायद्याच्या कचाट्यात अडकू नका. शुभ दिनांक : १७, १८.

धनु – टीकाकारांना गप्प कराल
अडचणी आलेली कामे करून घ्या. सूर्य- चंद्र लाभयोग आणि बुध- गुरू त्रिकोणयोग होत आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात टीकाकारांना गप्प करू शकाल. ठरवलेल्या योजना त्वरित पूर्ण होतील असे पाहा. लोकांची नाराजी दूर करू शकाल. वेळेला महत्त्व द्या. नोकरीत बदल करता येईल.
शुभ दिनांक : १८, १९.

मकर – प्रवासात सावध राहा
शुक्र-शनी षडाष्टक योग आणि चंद्र- नेपच्यून प्रतियुती होत आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न होईल. आरोप होतील. सोमवारी आणि मंगळवारी प्रवासात सावध राहा. तुमचे मानसिक संतुलन चांगले राहील. अहंकार करू नका. स्पर्धेत कठोर परिश्रम घ्यावे लागतील.
शुभ दिनांक : २०, २१.

कुंभ – दुखापत संभवते
सूर्य-चंद्र लाभयोग आणि शुक्र-मंगळ प्रतियुती होत आहे. जवळच्या लोकांना तुमचे विचार पटवून देण्यात अडचणी येतील. वाद वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव सर्वत्र वाढेल. स्वतःचे स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न करा. गुप्त कारवायांचा फारसा परिणाम प्रगतीवर होणार नाही. दुखापत संभवते.
शुभ दिनांक : १८, २३.

मीन – परदेशी जाण्याचा योग
सूर्य-चंद्र केंद्रयोग व चंद्र-शुक्र लाभयोग होत आहे. लोकप्रियतेच्या जोरावर तुम्ही तुमच्या कार्यात पुढे जाल. संघर्ष करावा लागेल, अडचणी येतील. विरोधकांना उत्तरे देण्यापेक्षा तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा. थकबाकी वाढवू नका. परदेशात जाण्याचा योग येईल. कौटुंबिक सुखात वाढ होईल.
शुभ दिनांक : १७, २१