धक्कादायक! हिंदुस्थानमध्ये जन्मल्यानंतर २८ दिवसाच्या आत दगावतात ६ लाख बालके !

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

जगभरात नवजात बालकांच्या मृत्यूदरात वाढ झाली असून यातील एक चतुर्थांश मृत्यू एकट्या हिंदुस्थानमध्येच होत असल्याची धक्कादायक माहिती यूनिसेफने आपल्या अहवालात दिली आहे. हिंदुस्थानमध्ये दरवर्षी जन्मल्यानंतर अवघ्या २८ दिवसाच्या आत तब्बल ६ लाख बालके दगावत असल्याचे युनिसेफने म्हटले आहे. जगभरातील इतर देशांच्या तुलनेत हा आकडा मोठा असल्याने युनिसेफने त्यावर चिंता व्यक्त केली आहे.

या नवजात बालकांच्या मृत्यूचे कारण प्रामुख्याने बाळंतपणाच्यावेळी गुंतागुंत निर्माण होणे, वेळेआधीच प्रसूती, न्यूमॉनिया व दूषित पाणी असल्याचा निष्कर्ष युनिसेफने मांडला आहे. एकीकडे हिंदुस्थानमध्ये पाच वर्षाहून कमी वय असलेल्या बालकांचा मृत्यूदर कमी झाला आहे. मात्र त्याचवेळी हिंदुस्थानमध्ये दरवर्षी सहा लाख नवजात बालके जन्मल्यानंतर २८ दिवसाच्या आत मृत्युमुखी पडत आहेत. ही चिंताजनक बाब असल्याचे युनिसेफने म्हटले आहे. यूनिसेफच्या अहवालातील ‘एवरी चाईल्ड अलाईव्ह’ या लेखात ही माहिती देण्यात आली आहे.

जगभरातील बालकांचा जन्मदर व मृत्यूदर तपासण्यासाठी युनिसेफने १८४ देशांत सर्वेक्षण केले होते. यात हिंदु्स्थानमध्ये नवजात बालकांचा मृत्यूदर २५.४ टक्के असल्याने या यादीत हिंदु्स्थानचा ३१ वा क्रमांक आहे.