नंदुरबारमध्ये उमद्या घोड्यांचे प्रदर्शन

सामना ऑनलाईन । नंदुरबार

चेतक महोत्सव आणि अश्व संग्रहालयाच्या माध्यमातून सारंगखेडय़ासारखे आदिवासी जिल्हय़ातील गाव आम्ही जगाच्या नकाशावर नेऊ, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज सारंगखेडय़ात अश्व संग्रहालयाचे भूमिपूजन झाल्यानंतर ते बोलत होते.

एमटीडीसीतर्फे ‘चेतक महोत्सव’ सुरू झाला असून २ जानेवारीपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. यावेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, आमदार विजयकुमार गावीत, खासदार हीना गावीत, महाराष्ट्र पर्यटक आणि सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालय विजय वाघमारे, एमटीडीसीचे सहसंचालक आशुतोष राठोड उपस्थित होते. यावेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी सारंगखेडय़ातील धार्मिक तसेच पर्यटनस्थळेही जागतिक दर्जाची करण्यासाठी पायाभूत सोयीसुविधा तयार करणार असल्याचे सांगितले. तसेच आगामी पर्यटनविषयक योजनांची माहिती दिली.

– महोत्सवात तीन हजार घोडे आले असून त्यातील ५० घोडय़ांची आतापर्यंत विक्री झाली आहे.

– देशी घोडे फक्त प्रदर्शनात भाग घेतात. घोडय़ांच्या शर्यतीत त्यांच्यावर बंदी आहे. इंग्रजांनी परदेशी घोडे पुढे जावेत म्हणून हिंदुस्थान पारतंत्र्यात असताना त्यांच्यावर बंदी घातली होती. केंद्र सरकारने ती आजही कायम ठेवली आहे.

– घोडय़ाचा वेगळा रंग, त्याची उंची आणि त्याची लांबी यावर त्याची किंमत ठरते.

– अंगावर विशिष्ट खुणा असतील तर त्याची किंमत त्याहून अधिक असते.

– पंचकल्याणी घोडा किंवा घोडी : ज्याच्या चारही पायांवर पुढच्या बाजूने एकाच रंगाच्या खुणा, तशीच खूण गळय़ावर किंवा मस्तकावर असते.

– घोडय़ाच्या प्रसिद्ध देशी जाती अबलक, मारवाडी, काठियावाडी.

असे असेल अश्वसंग्रहालय

तापी नदीच्या किनारी साडेसहा एकरावर हे संग्रहालय उभारले जाणार असून अशा प्रकारचे देशातील हे पहिलेच संग्रहालय ठरणार आहे. राज्य सरकारने त्यासाठी पाच कोटींचा निधी मंजूर केला आहे. संग्रहालयात घोडय़ांच्या प्रजाती, खुणा, घोडय़ांचे आयुष्यमान याविषयी माहिती असेल. तसेच संग्रहालयात कलादालन, प्रदर्शन स्थळ, ऑडिओ-व्हिज्युअल दालन, खाण्यापिण्याची सुविधा, दुकाने असणार आहेत. ‘अश्व संग्रहालयाबरोबरच सरकारने घोडय़ांसाठी वेटर्नरी रुग्णालय आणि ब्रिडिंग सेंटरही सुरू करावे. त्यामुळे चांगल्या देशी घोडय़ांची पैदास करणे आणि त्यांचे संवर्धन करणे शक्य होईल – जयपालसिंह रावल, अध्यक्ष चेतक महोत्सव