विकास हवा, तर किंमत चुकवावी लागणार – जेटली

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

विकास हवा असेल तर त्यासाठी काहीतरी किंमत चुकवावी लागणार, असे वक्तव्य अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केले आहे. फरिदाबादमध्ये आयोजित ‘नॅशनल अॅकॅडमी ऑफ कस्टम्स अँड नार्कोटिक्स’ च्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. विकास साधण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे. हा पैसा प्रामाणिकपणे खर्च झाला तरच विकास निश्चित होईल, असेही जेटली म्हणाले.

महसूल म्हणजे सरकारी व्यवस्थेचे जीवन आहे. महसुलाच्या माध्यमातून विकसनशील देशाला विकसित देश म्हणून घडवू शकतो. उत्पन्नावर कर लागत असूनही जे लोक कराचा भरणा करत नाहीत अशा लोकांना कराच्या कक्षेत आणण्यासाठी कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी जास्त जबाबदारीने काम केले पाहिजे. जे लोक कराच्या कक्षेत येत नाहीत त्यांच्यावर दबाव टाकण्याची गरज नाही असेही जेटलींनी म्हटले आहे. प्रत्यक्ष कर हा करदात्यांकडून घेतला जातो, जास्तीत जास्त करदात्यांनी पुढे आले पाहिजे. अप्रत्यक्ष कराचा बोजा मात्र सगळ्या देशावर पडतो आहे, असे जेटली यांनी सांगितले.