कंत्राटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन, आरोग्य सेवा कोलमडली

सामना प्रतिनिधी । बीड

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचारी यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सोमवारी ६ व्या दिवशीही सुरुच आहे. शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारी यांना शिक्षणाचे आधारे बिनशर्त शासन सेवेत समायोजन करावे तसेच समायोजन होत नाही तो पर्यंत समान काम समान वेतन देण्यात यावे, या मागण्यांसाठी शासनास जवळपास राज्य संघटनेने ३० ते ४० निवेदने देण्यात आलेली आहेत. प्रत्येक निवेदनामध्ये कंत्राटी कर्मचारी यांची सध्याची स्थिती अत्यंत कमी मानधन, त्यांच्यावर होणारे अन्याय, कार्यालयामध्ये होणारी दुय्यम दर्जाची वागणूक, कंत्राटी कर्मचारी यांच्यामध्ये निर्माण झालेली गुलामगिरीची जाणीव या सर्व प्रकारामुळे कंत्राटी कर्मचारी अत्यंत निराश झालेला आहे. यासाठी ११ एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलेले आहे.

जिल्हा परिषद बीड समोर आरोग्य अभियानातील सर्व ६०० कंत्राटी कर्मचारी भर उन्हात आंदोलनास बसलेले आहेत. आंदोलनामध्ये महिलांची संख्या जास्त असून सदर महिला आपल्या मुलाबाळासह उपस्थित राहत आहेत. या आंदोलनामुळे बीड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील एकूण आरोग्य सेवा सत्रांपैकी ८३ आरोग्य सेवा सत्र रद्द झालेले असून ०-५ वर्ष वयोगटातील ८४० लाभार्थी बालके लसीकरणापासून वंचित राहिलेले आहेत. प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेचे गरोदर मातांचे ऑनलाईन फार्म भरणे पूर्णपणे बंद असून यामुळे गरोदर माता या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहिलेले आहेत. हे आंदोलन असेच चालू राहिल्यास जिल्ह्यातील उर्वरीत आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडून पडणार आहे. आरबीएसके मधील कर्मचारी सोमवारपासून या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यामुळे अंगणवाडी तपासणी पूर्णपणे बंद आहे .

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन दडपण्यासाठी शासन विविध प्रकारचे हातखंडे वापरत आहे. त्यामुळे जर कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही राज्य किंवा जिल्हा स्तरावरून झाल्यास कंत्राटी कर्मचारी आपल्या परिवारासहित आत्महत्ये सारखे टोकाचे पाउल उचलू शकतो. याचा शासनाने संपूर्णपणे विचार करावा नसता आंदोलन आणखीन तीव्र करण्यात येईल असे आंदोलकांनी म्हटले आहे.