गरम पाणी अंगावर पडून दोन चिमुरड्यांचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । माजलगाव

बीड जिल्ह्यातील माजगाव शहरातील बंजारा नगरामध्ये गरम पाणी अंगावर पडून उसतोडणी मजुराच्या दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला आहे. वैष्णव जाधव (३) आणि वैभव जाधव (५) अशी या उसतोडणी मजुराच्या चिमुरड्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील बंजारा नगरामध्ये राहणारा विजय जाधव हा ऊसतोड मजूर आपल्या पत्नीसह उसतोडणीसाठी कर्नाटक राज्यातील साखर कारखान्यावर गेला होता. जाधव दांपत्याची दोन्ही लहान मुलांचा सांभाळ त्यांची आजी करत होती. गुरुवार सकाळी आंघोळीसाठी चुलीवर पाणी तापत ठेवले असताना वैष्णव व वैभव खेळण्याचे नादात चुलीजवळ गेले आणि त्यांचा गरम पातेल्याला धक्का बसला. धक्क्याने पातेल्यातील उकळते पाणी दोघांच्याही अंगावर पडल्याने दोघेही गंभीररित्या भाजले. त्यानंतर नातेवाईकांनी गंभीर भाजलेल्या दोघांना माजलगाव, लातूर आणि त्यानंतर पुणे येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना शनिवारी पुणे येथे ससून रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.