सात तोळ्यांची चेन हॉटेल ‘स्वागत’च्या मालकाने केली परत

सामना प्रतिनिधी । कोल्हा

लोणी येथील हॉटेल ‘स्वागत’मध्ये चाकण मधील कुटुंबाची सुमारे 3 लाख रुपये किंमतीची सोन्याची चेन अनावधानाने राहीली होती. मात्र हॉटेल मालक शामसुंदर तापडिया यांनी लोणी पोलिसांशी संपर्क साधून सुमारे 3 लाख रुपयांची सोन्याची चेन परत करीत प्रामाणिकपणा दाखविला.

याबाबत लोणी पोलीस स्टेशन मध्ये नव्यानेच पदभार स्वीकारलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील यांनी माहिती दिली. दिनांक 5 सप्टेंबर रोजी चाकण येथील सचिन खंडू नाणेकर रा. चाकण जि. पुणे हे आपल्या कुटुंबियांसह हॉटेलमध्ये थांबले होते. पुढील प्रवासा करीता सदरचे कुटुंब हॉटेल सोडून निघून गेले होते. मात्र जाताना त्यांची सात तोळ्याची सोन्याची चेन हॉटेल मध्ये विसरले. सदर बाब हॉटेल मालक शामसुंदर पन्नालाल तापडिया यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने याबाबत लोणी पोलीस स्टेशनशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर लोणी पोलीस स्टेशनचे स. पो. नि. प्रल्हाद पाटील व उप पो.निरीक्षक भालचंद्र शिंदे यांनी सदर व्यक्तीचा मोबाईल नंबर शोधून त्यांना संपर्क साधून त्यांना लोणी पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतले.

सदर कुटुंब पुन्हा लोणी मध्ये दाखल झाल्यानंतर सोन्याच्या चेनची शहानिशा करून सात तोळे वजनाची सोन्याची चेन सचिन खंडू नाणेकर यांच्या स्वाधीन केली. स्वागत हॉटेलचे मालक तापडिया यांनी प्रामाणिकपणा दाखविल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.