1..2..3..4.. ‘लंडनच्या पार्लमेंट’मध्ये गणपतीचा जयजयकार

सामना प्रतिनिधी । मुंबई

लंडनमधील हौन्स्लो गणेशोत्सव मंडळाचा गणराय यंदा थेट पार्लमेंटमध्ये विराजमान होणार आहे. ही नक्कीच गणेशभक्तांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. लं डनमधील भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. गणरायाच्या आगमनासाठी सारेच सज्ज झाले आहेत.

10 वर्षांपूर्वी लंडनमध्ये काही मित्रांनी घरातून सुरू केलेला गणेशोत्सव हौन्स्लो, लंडन येथील लक्ष्मीनारायण मंदिरात गेली 9 वर्षे हौन्स्लो गणेशोत्सव मंडळ म्हणून प्रसिद्ध आहे. हा गणेशोत्सव दरवर्षी दोन दिवस साजरा केला जातो. गेली 3 वर्षे कांदिवलीतील गणपती मूर्तिकार प्रशांत मयेकर यांच्याकडून 4 फुटांची मूर्ती लंडनमध्ये नेली जाते. वर्षाला 3 ते 5 हजार भाविक मूर्तीचे दर्शन घेत असतात. हौन्स्लो गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या प्रचंड मेहनतीमुळे हे शक्य होते. पण सगळ्याच लोकांना हौन्स्लोमध्ये दर्शन घेणे शक्य नसते. म्हणून यंदा हा गणेशोत्सव हौन्स्लोमध्ये आणि सेंट्रल लंडनमधील हाऊसेस ऑफ पार्लमेंट या दोन ठिकाणी साजरा होणार आहे. भाविकांना दोन्ही ठिकाणी गणरायाचे दर्शन घेता येईल. यावर्षीही ब्लॅकबर्न रोव्हर्स आणि वेंकीस ग्रुपचे बालाजी राव आणि परिवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

पार्लमेंटमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना ही सर्व हिंदुस्थानांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. याचे श्रेय हौन्स्लो गणेशोत्सव मंडळ आणि मंडळाचे पदाधिकारी अनघा अत्रे-पाब्रेकर, मोनाली मोहिते-सेल्वाराज, महेश शेट्टी, सुजय सोहनी, सूरज लोखंडे आणि वैभव रावराणे यांना जाते.

hounslow-ganeshotsav-mandal

लंडनमधील खासदार (मेंबर ऑफ पार्लमेंट) सीमा मल्होत्रा यांच्या सहकार्याने गणेश चतुर्थीला सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत सर्व भाविकांसाठी दर्शनसाठी वेस्टमिन्स्टर पॅलेस अर्थात लंडनचे हाऊसेस ऑफ पार्लमेंटमध्ये ज्युबली रूम खुली करण्यात येणार आहे. प्रवेश विनाशुल्क आहे.

त्यानंतर दुपारी 3 ते रात्री 10 पर्यंत हौन्स्लोच्या पॉल रॉब्सन थिएटरमध्ये दर्शनाचा लाभ घेता येईल. यावेळी मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

14 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 ही दर्शनाची वेळ असून त्यानंतर विसर्जन सोहळा रंगेल.
लंडनच्या रस्त्याकर मिरवणूक निघेल. पारंपरिक वेशभूषेत, गाणी, आरती म्हणत गणरायाला निरोप दिला जाईल. मूर्तीचे विसर्जन थेम्स नदी काठी होईल.