नाशिकमध्ये दोन दिवसात पाच घरफोड्या, आठ लाखांहून अधिक ऐवज लंपास

सामना ऑनलाईन, नाशिक

दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे अनेकजण बाहेरगावी गेल्याने चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य करीत धुमाकूळ घातला आहे. दोन दिवसात पाच घरफोडय़ा झाल्या असून, चोरट्यांनी ८ लाख ४४ हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

चेतनानगरला भटेंद्रनाथ चौधरींच्या घराच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी काल पावणेपाच तोळे सोन्याचे दागिने, रोकड पळविली. आडगावच्या शरयू पार्क येथील राजेंद्र पितृभक्त यांच्या घराचे कुलूप तोडून १२ तोळ्यांचे १ लाख ९१ हजाराचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याचे आज लक्षात आले. पाथर्डी फाटा भागात बाळासाहेब पंढरीनाथ बोराडे यांचे घर फोडून शनिवारी चोरट्यांनी १ लाख ६० हजाराची रोकड व सवापंधरा तोळ्यांचे सोन्याचे दागिने असा ४ लाख ६५ हजारांचा ऐवज चोरला. याचदिवशी भरदुपारी उंटवाडीतील तिडकेनगर येथील अजय अनंत कुलकर्णी यांचे घर फोडून चोरट्यांनी रोख रक्कमेसह सोन्याची अंगठी असा २६ हजारांचा ऐवज चोरला. सातपूरला लिलाधर फुलझले यांच्या बंद घरातून रोख पैसे, सोन्याचे दागिने चोरीस गेले आहेत.

गंगापूर रस्त्यावर घरफोडीचा प्रयत्न
गंगापूर रस्त्यावर सिरीन पार्क येथील सरिता रस्तोगी यांच्या घराचे सेफ्टी डोअरचे कुलूप तोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला, मात्र तो फसला.

सोनसाखळी चोरीच्या दोन घटना
केटीएचएम महाविद्यालयाजवळील सिद्धीविनायक हॉस्पिटल भागात संजय भाऊराव लटके यांना रविवारी मोटारसायकलस्वार दोघांनी अडविले, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, त्यांच्या गळ्यातील चांदीची चेन हिसकावली. दुसरी घटना शनिवारी सायंकाळी नाशिकरोड येथील दत्तमंदिर भागात घडली. पायी जाणाऱया शारदा कोठावदे यांच्या गळ्यातील साडेतीन तोळे वजनाची चेन मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ांनी ओरबाडून नेली.