सिलेंडरच्या गळतीमुळे घराला आग, सुदैवाने कुठलीच जीवीत हानी नाही

सामना ऑनलाईन । तुमसर

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील डोंगरला गावात सिलेंडरच्या गळतीमुळे एका शेतकऱ्याचे घर जळून खाक झाले आहे. फुलचंद देशकर असं या शेतकऱ्याचे नाव असून आगीमुळे घरातील एक लाख 10 हजारांची रोकडही जळाली आहे. सुदैवाने आगीत कोणतीही जीवीत हानी झाली नसली तरी, एैन पोळ्याच्या दिवशी देशकर कुटुंब रस्त्यावर आले आहे. त्यामुळे लवकरात लवकर पंचनामा करून पिडीत कुटूंबाला नुकसान भरपाई देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

डोंगराला गावात राहणाऱ्या देशकर यांच्या पत्नी पहाटे दिवा घेऊन स्वयंपाक घरात पोहचताच सिलेंडरचा पाईप गळती होऊन आग लागली. त्यामुळे त्वरीत घरातील इतर सदस्यांना ऊठवून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग वाढतच गेली आणि संपूर्ण घर आगीच्या विळख्यात सापडले. घराला आग लागल्याची बातमी गावात पसरताच गावकऱ्यांनीही आग विझविण्याचे प्रयत्न केले मात्र, आग आटोक्यात येत नसल्याने तुमसर नगर परिषदेच्या अग्निशमन दलालाचा बोलाविण्यात आले. अग्निशमन दलाचा बंब पोहचेपर्यंत आगीच्या विळख्यात संपुर्ण घर भस्मसात झाले. आगीची तीव्रता अधिक असल्याने घरातील दोन सिलेंडरचेही स्फोट झाले. या आगीत आगीत अन्न धान्यासह घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत. तसेच देशकर यांनी जमवलेले 70 हजार रुपये आणि शेजारच्या बोरकर यांचे घराचे बांधकाम सूरू असल्याने त्यांनी ठेवण्यासाठी दिलेले 40 हजार रुपये अशी एकुण एक लाख दहा हजार रुपयांची रक्कम जळून खाक झाली आहे. त्यामुळे एैन सणासुदीला फुलचंद यांचा संसार उघड्यावर आला आहे.