मसुरेत घराला आग लागून ४० हजारांचे नुकसान

सामना प्रतिनिधी । मालवण

मसुरे देऊळवाडा ख्रिस्तवाडी टेंब येथील लुईस मारकू डिमेलो यांच्या घराला आग लागून ३५ ते ४० हजाराचे नुकसान झाले आहे. घरालगतच्या वीज खांबावरील वीज वाहिन्यातील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास डिमेलो कुटुंबीय मतदान करण्यासाठी गेले असता आगीची घटना घडली.

आगीत घराच्या छप्परचे फायबर पत्रे जळून खाक झाले. लगतच्या मांगरवजा शेडीतील जुने इमारती लाकूड सामान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले तसेच एक आंब्याचे झाड व नारळाचे झाड या आगीत भस्मसात झाले. नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. यावेळी देऊळवाडा तलाठी संदीप कांदळकर, पोलीस पाटील नेवेश फर्नांडिस, लुईस डिम्यालो, बस्त्याव लोबो, विलास बागवे उपस्थित होते.