स्टोव्हच्या भडक्याने घराला आग

सामना प्रतिनिधी । पाथर्डी

पाथर्डी तालूक्यातील मिरी येथील इस्माईल लाडसाहब शेख व जावेद इस्माईल शेख यांच्या राहत्या घरात गुरूवारी दुपारी दोनच्या सुमारास स्टोव्हचा भडका होवून लागलेल्या आगीमध्ये शेख यांच्या घरातील धान्य, संसार उपयोगी वस्तू जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही.

दुपारच्या सुमारास शेख यांच्या राहत्या घरामध्ये स्वयंपाक सुरू असतांना बाहेर शेळी सुटल्याने ती बांधण्यासाठी घरातील मुलगी बाहेर आली असता घरातील स्टोव्हचा भडका उडाल्याने काही क्षणात छपराने पेट घेतला. या आगीत घरातील धान्य, सोने-चांदी, कपडे, रोख रक्कम जळून खाक झाली. यामध्ये इस्माइल शेख यांचे ३ लाख ८२ हजार रुपयांचे तर जावेद शेख यांचे ३ लाख ७२ हजार रुपयांचे नुकसाम झाले आहे. या घटनेची माहिती समजताच सरपंच निता मिरपगार, माजी सरपंच शशीकला सोलाट, जगदीश सोलाट, तलाठी श्रीमती मनाळ, आणासाहेब शिंदे, राजेंद्र तागड, साहेबराव गवळी, संभाजी सोलाट, राजू इनामदार, अशोक झाडे, बापूसाहेब कोरडे, सत्तार गफूर, रवींद्र मिरपगार, एस बी सोलाट, समीर शेख हे घटनास्थळी गेले व त्यांनी आग आटोक्यात आणली.