‘पँट सांभाळता येत नाही हे आया – बहिणींचं काय रक्षण करणार ?’

सामना ऑनलाईन । जयपूर

हल्लीचे तरुण कंबरेवरून खाली सरकणाऱ्या ”लो वेस्ट पॅण्ट’ घालून फिरत असतात. ज्या तरुणांना स्वत:ची पॅण्ट सावरता येत नाही ते त्यांच्या आयाबहिणींचे संरक्षण कसे करतील ? असे वादग्रस्त वक्तव्य भाजपच्या महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा व राजस्थान महिला आयोगाच्या अध्यक्षा सुमन शर्मा यांनी केले आहे. महिला दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय. त्यांच्या या वक्तव्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

‘ पूर्वी रुंद छाती त्यावर घनदाट केस असलेले पुरुष बायकांना आवडायचे पण हल्ली रुंद छातीचे पुरुष दिसतच नाहीत. तर हल्ली कंबरेखाली लोंबकळत असलेल्या जीन्स घातलेले तरूण सगळीकडे दिसतात. कानात मुलींसारख्या रिंगा घालतात, मुलींसारखंच नाजूक दिसण्यावर त्यांचा भर असतो. या तरुणांना स्वत:ची जीन्स देखील सावरता येत नाही. मग असे तरुण त्यांच्या आया- बहिणींचं संरक्षण कसे करतील? आपल्याला आता हे सर्व बदलायला हवे. आपल्या मुलांना पूर्वी जसे पुरुष कणखर होते तसे बनवले पाहिजे. रुंद छाती, भारदस्त व्यक्तिमत्त्व असलेली तरुणांची पिढी तयार व्हायला हवी. त्यासाठी प्रत्येक तरुणाच्या आईनेच प्रयत्न करायला हवेत, असा सल्लाही शर्मा यांनी दिलाय.

या कार्यक्रमात शर्मा यांनी महिलांना देखील खडे बोल सुनावले. तुम्हाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेत पुरुषांच्या पुढे जायचा प्रयत्न करू नका. जेव्हा तुम्ही पुरुषांच्या बरोबरीनेच चालाल तेव्हाच समाजाचा विकास होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.