तुमचे काम सिनेमा दाखवणं, खाद्यपदार्थ विकणे नाही!

सामना ऑनलाईन, मुंबई

मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी घालणाऱया चित्रपटगृहांच्या मालकांची मुंबई उच्च न्यायालयाने आज चांगलीच खरडपट्टी काढली. लोक सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ नेतात त्यावेळी सुरक्षेचा कोणताच प्रश्न निर्माण होत नाही, पण चित्रपटगृहात खाद्यपदार्थ नेल्यास तेथील सुरक्षेवर काय परिणाम होतो त्याची अगोदर माहिती द्या, असे फटकारत यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने आज सरकारला दिले. एवढेच नव्हे तर खाद्यपदार्थ विकणे हे तुमचे काम नाही. सिनेमा दाखवणे हे तुमचे काम आहे, असे खडे बोलही चित्रपटगृहांच्या मालकांना यावेळी सुनावले.

सिनेमागृहात महागडय़ा दरात अन्नपदार्थ विकले जातात. बाहेरील खाद्यपदार्थ आत नेऊ दिले जात नाही त्यामुळे आजारी अथवा वृद्ध माणसांची गैरसोय होते. याप्रकरणी जैनेंद्र बक्षी यांनी ऍड. आदित्यप्रताप सिंह यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. हे दर नियंत्रणात आणावे यासाठी सरकारने उपाययोजना करावी अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. न्यायमूर्ती रणजीत देसाई आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर आज पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले. बाहेरील खाद्यपदार्थांमुळे चित्रपटगृहातील सुरक्षेवर काय परिणाम होणार आहे त्याची माहिती देण्याचे आदेश खंडपीठाने दिले. लोक विमानात खाद्यपदार्थ घेऊन जाऊ शकतात तर चित्रपटगृहात का नाही, असा खरमरीत सवालही  हायकोर्टाने केला. मल्टिप्लेक्समध्ये तुम्ही महागडे खाद्यपदार्थ विकता. याशिवाय लोकांना घरातील खाद्यपदार्थ आणण्यासाठी विरोधही करता.  तुम्ही लोकांना जंक फूड खाण्यासाठी का भाग पाडता याचा जाबही न्यायमूर्तींनी विचारला. तसेच लोकांना चित्रपटगृहात खाद्यपदार्थ घेऊन जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असेही सुनावले.

कुणीही कायदा हातात घेण्याची गरज नाही

 मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही अनेकजण याप्रकरणी आंदोलन करत आहेत. त्यामुळे कुणीही कायदा हातात घेण्याची गरज नाही. कायद्याचे कोणाकडूनही उल्लंघन होत असेल तर पोलीस आहेत, न्यायालये आहेत त्यांच्याकडे दाद मागावी, असे स्पष्ट करत हायकोर्टाने मनसेच्या आंदोलनावर नाराजी व्यक्त केली.