परवानगीशिवाय गणपती मंडप उभे राहतातच कसे?

सामना प्रतिनिधी, मुंबई

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच बेकायदेशीर मंडप उभारणाऱ्या गणेश मंडळांवर मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. परवानगी नसतानाही अवैधपणे मंडप उभे राहतातच कसे, असे खडसावत बेकायदेशीर मंडपांवर ताबडतोब कारवाई करा असे आदेश उल्हासनगर पालिकेला देण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर, २२ ऑगस्टपर्यंत कारवाईचा अहवाल सादर करा, असेही न्यायालयाने बजावले.

मुंबई व उपनगरातील रस्त्यांवर बेकायदेशीर उभारण्यात येणाऱ्या मंडपांचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. अनधिकृत मंडपांसंदर्भात हिराली फाऊंडेशनच्या वतीने याचिका सादर करण्यात आली. त्यावर सुनावणी आज घेण्यात आली.
बेकायदेशीरपणे उभारलेल्या गणपती मंडपांत सजावटीची कामे २४ तास सुरू असून गणपती मंडपांत बसण्याची वाट पाहत आहात का? या मंडपांवर कारवाई कधी करणार, असा प्रश्न न्यायालयाने यावेळी उपस्थित केला. न्यायमूर्ती अभय ओक आणि रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर याचिकाकर्त्यांनी बेकायदेशीर मंडपांचे फोटोही सादर केले. आपली भूमिका स्पष्ट करताना पालिकेने या मंडळांनी परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले.