‘दाऊदची पत्नी हिंदुस्थानात येऊन जाते; सरकार झोपले होते का?’

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला खंडणी प्रकरणी काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली आहे. कासकरच्या अटकेनंतर त्याच्याकडून खळबळजनक माहिती समोर येऊ लागली आहेत. पोलिसांनी केलेल्या चौकशीत कासकरने दाऊदची पत्नी महजबी शेख ही २०१६ मध्ये वडील सलीम कश्मीर याला भेटण्यासाठी हिंदुस्थानात येऊन गेली, अशी माहिती दिली आहे. या संपूर्ण माहितीनंतर काँग्रेसनं मोदी सरकारवर टीका केली आहे.

कुख्यात दाऊद इब्राहिम याची पत्नी हिंदुस्थानात येऊन आपल्या वडिलांना भेटून गेली पण मोदी सरकारला याची खबरच लागली नाही. सरकार झोपले होते, असा आरोप कॉंग्रेसचे नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केला आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून सुरेजावाला यांनी म्हटले आहे की, महजबी शेख आपल्या वडिलांना भेटण्यासाठी गेल्या वर्षी (२०१६) मुंबईत आली होती. पण, सरकारला याची काहीही माहिती नाही. त्यावेळी ‘सीबीआय’ आणि ‘रॉ’ या संस्था काय करत होत्या, असा सवालही विचारला आहे. तसेच दाऊदची पत्नी हिंदुस्थानात येते मात्र तिला अटक होऊ शकत नाही? तिच्या विरूद्ध कारवाई का नाही केली गेली? असा सवाल विचारत सरकारने या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे असेही सुरजेवाला यांनी म्हटले आहे.