असे व्हा आदर्श आईबाबा

सामना प्रतिनिधी । मुंबई

आईबाबा होणं एक अत्यंत आनंददायी घटना पण त्याचबरोबर एक छानशी जबाबदारीदेखील. आपल्या मुलांसमोर कसे वागावे याबाबत सोप्या सूचना…

  • घरात मुलांसमोर कसं वागायचं त्याचेही काही अलिखित नियम आहेत. रात्री मुलांबरोबर मुकाटपणे जेवण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा मुलांशी गप्पा मारायच्या… त्यांना आजच्या दिवसभरात काय चांगलं घडलं, काय वाईट घडलं ते विचारून घ्यायचं.
  • घरात मुलांसमोर भांडण, आदळआपट टाळायला हवी. नाहीतर मुलांच्या मनात वडिलांबद्दल अढी निर्माण होते ती कायमचीच. मुलांना त्यांच्या कलेने घेत शिकवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजेच ‘दिवसभर तू कसाही वाग, पण दिवसातून एक तरी चांगली गोष्ट कर आणि आम्हाला त्याबद्दल सांग’… असं त्यांना सांगितलं तर मुलांवर चांगला प्रभाव पडेल.
  • पालक मुलांना नेहमीच घालून पाडून बोलत राहिले तर मुलं पालकांना टाळायचा प्रयत्न करतील. अशावेळी मुले आणि पालकांमधला संवादच संपून जाईल. मुलांनी एखादी चूक केली, तरी लगेच त्याला माफ करून टाकलं तर पुन्हा तो तशी चूक नक्कीच करणार नाही. वडिलांनी मुलांना आपला जास्तीतजास्त वेळ द्यायला हवा. मुलांसमोर छोटय़ा छोटय़ा गोष्टीतून वडिलांनी आईसाठी प्रेम व्यक्त केले तर मुलांच्या मनात प्रेमच नांदेल यात शंका नाही. पण मुलं ही आपली गुंतवणूक, म्हातारपणची काठी अशा नजरेने मुलांकडे पाहणे चांगले नाही. उलट मुलांचे कोणते छंद आपल्याला जोपासता येतील याचा विचार पालकांनी करायला हवा. आपल्या मुलांची खरी गरज काय आहे ते जाणून घ्या.
  • मुलांसमोर पालकांनी कुठलंही व्यसन करायचे नाही. कारण मुले आईबाबांकडेच पाहात असतात. ते करतात ते सगळं बरोबर अशीच त्यांची भावना असते. अशावेळी त्यांच्यासमोर व्यसन कराल तर ते चांगलेच अशी त्यांची भावना होऊ शकते. आता घरात एखादी वस्तू विकत घ्यायचे ठरवत असाल, तर तो निर्णय घेण्याआधी मुलांनाही त्याबाबत कल्पना द्यायला हवी. ती वस्तू घेणे किती गरजेचे आहे हे त्यांना पटवून द्यायचे. या खरेदीमागची प्रोसेस त्यांना समजावून सांगा.
  • पतीने ऑफिसमध्ये जाताना बॉससारखे जायचे, पण घरी परतताना नवरा म्हणून यायचे असते. तर दोन्ही ठिकाणी त्या व्यक्तीचा आनंद सारखा राहू शकतो. मुलांना कधीच नकारात्मक बोलायचे नाही. नालायका, गधडा वगैरे शब्द वापरले तर मुलांच्या मनात हीनभावना निर्माण होते. उलट मुलांना हिंमत द्या. त्यांनाही काही ठिकाणी धोका पत्करायची सवय लावा. कारण कोणताही धोका आला की त्यातून त्यांना वाचवण्याचं काम आई करते, पण काही प्रसंगी त्यांनाच रिस्क घेऊ द्या.
  • मुलांना मारून त्यांच्यावर संस्कार लादता येत नाहीत. उलट त्यामुळे मुले खोटे बोलायला शिकतात. उलट त्यांना समजावून सांगायचे. पण ‘तू जर असं केलंस तर मी सोडून जाईन, तुला एकटं सोडून देईन, असं कधीच बोलायचं नाही. मुलांना चुकीबद्दल बोलता, तर मग त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचं कौतुकही कराच. कारण कौतुक होत असेल तर मुले झटून चांगले वर्तन दाखवतील. शेवटी गुरू भेटणं महत्त्वाचं असतं. मुलांना त्यांचा पहिला गुरू म्हणजे त्यांचे आईबाबाच असतात.