‘ऑनलाइन’ नाटक

>>नमिता वारणकर<<

बुक माय शोमुळे नाटकांची तिकिटे मोबाइलवर नोंदविता येतात. पण बऱ्याचदा हव्या त्या रांगेतील तिकीट मिळतेच असे नाही. अजूनही सोपे पर्याय उपलब्ध आहेत.

नाटक आपल्या संस्कृतीचा अमूल्य ठेवा… तो जपण्याचा प्रयत्न आजही कलाकारांसह रसिक प्रेक्षकांकडून केला जातो… पूर्वी रात्रीच्या वेळी सादर होणारे दशावतार, भारुड, लोकगीते… त्यानंतर प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवरील नाटकं… अशा या विविध जिवंत कलाकृतींचा आनंद घेण्यासाठी रसिकांची उपस्थिती आवर्जून असतेच… आपल्या आवडीचे नाटक बघण्यासाठी कितीही मोठी रांग लावावी लागली तरी चालेल, प्रेक्षकांची उपस्थिती असतेच… आता मात्र ‘नाटकांचे तिकीट काढणे’ या प्रक्रियेला आधुनिक तंत्राची जोड लाभलीय. घरबसल्या लॅपटॉप, संगणकावरून काही दिवस आधीच प्रेक्षक नाटकाचे तिकीट काढू शकतात. त्यामुळे सर्व वयोगटाच्या प्रेक्षकांना कुठेही रांगेत उभे न राहता तिकीट मिळणे सहज शक्य होते. मात्र काही वेळा हव्या त्या रांगेतील तिकीट मिळतेच असे नाही. बऱ्याचदा ते कोणत्या संकेतस्थळावरून बुक करायचे ते माहीत नसते. अशावेळी गैरसोय होऊ नये याकरिता ऑनलाइन माध्यमातून तिकिटांची खरेदी करता येते. यासाठी सर्वच नाटय़गृहावर डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे तिकिटे विकत घेण्याची सोय आहे.

मराठी नाटक ऍप

‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘कुसुम मनोहर लेले’, ‘ती फुलराणी’, ‘तो मी नव्हेच’, ‘युगपुरुष’, ‘शांतेचं कार्ट चालू आहे’, ‘मोरुची मावशी’, ‘संशय कल्लोळ’, ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’… अशी दर्जेदार नाटकं रसिकांना आजही बघावीशी वाटतात. त्याकरिता ही नाटकं हव्या त्या वेळी बघण्याचा आनंद ‘मराठी नाटक’ या ऍपद्वारे घेता येतो. त्याकरिता हे ऍप मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्यास केव्हाही, कुठेही, मोकळय़ा वेळेत आजही या सुप्रसिद्ध नाटय़ाकृती प्रेक्षकांना पाहायला मिळू शकते.

ऑनलाइन तिकिटांसाठी…

* वेदनाटक (www.vednatak.in) गोपाळ अलगेरी यांच्या ‘वेद प्रोडक्शन’ने नाटकाच्या प्रयोगासाठी या संकेतस्थळावर प्रेक्षकांसाठी नाटकाची तिकिटे ऑनलाइन घेण्याची सोय केली आहे.

* बुक माय शो (Book my show) या संकेतस्थळावर आज, उद्या आणि पुढच्या दोन आठवडय़ांमध्ये होणाऱ्या नाटकांची यादी आधीच प्रसिद्ध झालेली असते. त्यामुळे येथून प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या नाटकाचे तिकीट दोन आठवडे आधीही काढता येऊ शकते. शिवाय मराठी, इंग्रजी, हिंदी, मल्याळम, उर्दू, गुजराती, जिब्रिश, पंजाबी असे कोणत्याही भाषेतील नाटकाचे तिकीट यावर मिळू शकते.

* तिकिट्स डॉट कॉम (http://ticketees.com) यावर आठ दिवस आधीच मुंबईतील नाटय़गृहात सादर होणाऱ्या नाटकांची यादी पाहायला मिळते.

* मुंबई थिएटर गार्डड डॉट कॉम (http://www.mumbaitheatreguide.com) या संकेतस्थळावर नाटकाची वेळ, दिवस, संपर्क कुठे कराल, त्याकरिता फोन बुकिंग क्रमांकही उपलब्ध आहे.

* प्रशांत दामले डॉट कॉम (www.prashantdamale.com) या वेबसाईटवर 24 तासांत होणाऱ्या नाटकांचा संपूर्ण आराखडा पाहायला मिळतो. 300 आणि 200 रुपयांची तिकिटे ऑनलाइन बुक करता येतात.

* नाटकांच्या नावानुसार तयार केलेल्या फेसबुक पेजवरूनही ऑनलाइन तिकिटाची नोंदणी करता येऊ शकते.