गर्भाशय कर्करोग कसा ओळखावा?

>>डॉ. अनिल हेरूर<<

दरवर्षी जागतिक स्तरावर पाच लाखांहून अधिक महिलांना गर्भाशयाचा कर्करोग होतो असे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार निदर्शनास आले आहे.  जानेवारी महिना ‘गर्भाशयाच्या कर्करोग’ जागरूकतेचा आहे. पॅप स्मीअर्स आणि एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) या नियमित चाचण्यांच्या मदतीने या आजाराची तपासणी करता येते. गर्भाशयाचा कर्करोग कसा ओळखावा आणि त्याला प्रतिबंध कसा करावा यासाठी काही उपायांची अंमलबजावणी करणे सोयीचे आहे.

> २० ते ५० वर्षे वयोगटातील स्त्रयांनी दर दोन ते तीन वर्षांतून एकदा गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी करणे आवश्यक आहे. २० वर्षांखालील स्त्रयांना हा कर्करोग झाल्याची काही उदाहरणे पाहायला मिळाली आहेत. लैंगिकदृष्टय़ा सक्रिय झाल्यानंतर या चाचण्या नियमितपणे करणे आवश्यकता आहे.

> या आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी लहान वयातच (१२ आणि १३ वर्षे) मुलींना लस देणे हा एक चांगला पर्याय आहे. लसीमुळे गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळतेच असे नाही. मात्र त्याचा धोका निश्चितच कमी होतो, मात्र संपत नाही.

> ६५पेक्षा जास्त वय असेल आणि नियमितपणे तपासणी करत असाल अशा वेळी काही लक्षणे आढळून न आल्यास तुम्हाला चाचणी करायची गरज राहत नाही.

> लैंगिक संबंधादरम्यान वेदना होणे, ओटीपोटात दुखणे, मासिक पाळीदरम्यान अतिजास्त रक्तस्राव होणे, विनाकारण वजन खूप कमी होणे अशा लक्षणांकडे स्त्रयांनी लक्ष द्यायला पाहिजे.