सर्पमित्रांसाठी काही खास टिप्स

प्रातिनिधीक फोटो

भरत जोशी, सर्प अभ्यासक

सर्पमित्र. कोणाकडेही साप निघाला की त्याला सुरक्षितपणे पकडून पुन्हा जंगलात सोडून देणे ही त्याची मुख्य जबाबदारी. पण यामध्ये सर्पमित्राच्या जीवालाही धोका असतो त्यामुळे पुढील दहा नियम पाळा सर्पदंश टाळा.

 • जागेचे निरीक्षण – जागा खडकाळ, शेतीकडील भाग, चिखल – दलदल, पाणवठा, झाडेझुडपे, दगडगोटे, विटांचा ढिगारा, गोडावून, निवासस्थान, फॅक्ट्री, वर्कशॉप, लोखंडी सामान अशा ठिकाणी कुठल्या प्रकारचे सर्प आढळतात ते सर्पमित्रांना माहीत असणे आवश्यक असते. अशा अडगळीच्या ठिकाणी नाग, मण्यार, घोणस, धामण, पाणसर्प, अजगर असू शकतात.
 • लोकांकडून माहिती – सर्प असलेल्या ठिकाणी जमलेल्या जनसमुदायाकडून माहिती घेणे. सर्प प्रत्यक्ष कोणी बघितला असल्यास सर्पाचा रंग, लांबी, जाडी, चपळता इत्यादींची माहिती घेतल्यास अनुभवी सर्पमित्रांना साधारण अंदाज बांधता येतो की साप कोणत्या प्रजातीचा आहे.
 • हूकस्टिक, काठी तसेच टाँगचा वापर अत्यावश्यक – अडगळीतील साप पकडताना हूकस्टिक किंवा काठीचा, टाँगचा उपयोग करावा. संध्याकाळी, रात्री किंवा काळोखात टॉर्च जरूर वापरावा, तो उपलब्ध नसल्यास हेडलाईट किंवा मोबाईलमधील टॉर्चचा वापर करावा. या वस्तू सापाच्या कॉलवर जाताना आपल्या स्नेक बाईट-किटमध्ये ठेवाव्यात. बऱयाचदा त्या वस्तू त्या जागेवर मिळत नाहीत.
 • प्रलोभनांना बळी पडू नका – लोक सांगताहेत की, अडगळीतील साप १०० टक्के बिनविषारी आहे. त्याला डायरेक्ट हाताने पकडा. तो चावणार नाही. अशा सांगण्यावर विश्वास ठेवून अडचणीत हात घालून स्वतःचा जीव संकटात टाकू नका.
 • संपूर्ण सुरक्षा – आपल्याला साप पकडणे १०० टक्के सुरक्षित वाटत असेल तरच पुढे जाण्याचे धाडस करून साप  शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून पकडा. साप मोकळय़ा जागेत आला की भ्रमणध्वनीवर संपर्क साधा असे संबंधितांना सांगा.
 • अतिउत्साह टाळा – ‘सर्प’ तो ‘सर्पच’ आहे हे आपण विसरता कामा नये. जनसमुदायाची मानसिकता विभिन्न असून ती प्रसंगी आपल्याला आणि इतरांनाही धोकादायक ठरू शकते. अतिसावधानतेने व संयम ठेवून आपली कार्यपद्धती ठरवा.
 • ‘साप’ तो ‘सापच आहे – सर्प पकडायला कॉलवर जाताना स्नेकबाईट – किटबरोबर प्रथमोपचार आवश्यक आहे.
 • पाणवठय़ाजवळील साप पकडताना विशेषतः विहिरी, नद्या, तळे, तलाव अशा ठिकाणी सापडणारे सर्प हे बहुतांशी ‘बिनविषारी’ असतात. परंतु त्याची खातरजमा करूनच हुक-स्टीक, टाँगचा वापर करून साप पकडा.
 • शेतातील किंवा शेतजमितीतील साप पकडताना – प्रत्येक वेळेस हुकस्टिक, काठी, टाँग इत्यादींचा वापर करा. चपला स्लिपर, सँडल्सचा वापर टाळून शूजचा वापर करा. हाफ पॅण्ट, लुंगी, बर्मुडा न घालता फुल लुझ पॅण्ट घाला. जेणेकरून सर्पाचा दंश हा लुज पॅण्टवर जाईल. लोक म्हणतील तुम्ही तयारीचे सर्पमित्र आहात.
 • सर्प – विंचू – नारायण दुरुनी माझा नमस्कार – हा ‘गुरुमंत्र’ ध्यानात ठेवा. जरी सर्पमित्र सर्पाला आपले मित्र मानत असतील तरी सर्व आपल्याला मित्र कधीच मानणार नाहीत. आपला स्वभावधर्म कधीही सोडत नाही. फणा काढलेल्या नागाच्या डोक्यावर हात ठेवणे, नागाच्या फण्याचे मागून किंवा पुढून चुंबन घेणे, एका वेळेस २ ते ३ नाग हाताळणे, घोणस या विषारी सर्पाला तळहातावर, डोक्यावर ठेवणे असा फाजील, जीवघेणा प्रयत्न आणि स्टंटबाजी करू नका.
 • सुज्ञ, सुरक्षित सर्पमित्र बना – स्नेक कॉलवर जाताना सर्पमित्राने आपल्या कुटुंबाचा ग्रुपफोटो पहा. भान ठेवून ‘साप सुरक्षितपणे पकडा तसेच वनविभागामार्फत ती सर्पप्रजाती सुरक्षितपणे जंगलात निसर्गमुक्त करा.