सुरक्षित ‘मॅनहोल्स’ची शोधमोहीम सुरू!

सामना ऑनलाईन, मुंबई

अतिवृष्टीच्या दिवशी एलफिन्स्टन परिसरात मॅनहोल उघडे ठेवल्यामुळे प्रख्यात डॉ. दीपक अमरापूरकर यांना जीव गमवावा लागल्यानंतर आता सुरक्षित मॅनहोल्ससाठी पर्याय शोधण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले आहे. याकरिता नागरिकांकडून आलेल्या सूचना आणि फेसबुकवर नेटकऱयांनी दिलेले पर्याय यांचा यासाठी विचार केला जाणार आहे. मुख्य झाकणाच्या खाली जाळी बसवण्याचा प्रशासनाचा विचार आहे.

शहर आणि उपनगरात पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी आणि मलनिस्सारणासाठी अनेक ठिकाणी मॅनहोल आहेत. हे मॅनहोल देखभालीच्या कारणास्तव पालिकेच्या कर्मचाऱयांकडून किंवा कंत्राटदारांकडून उघडले जातात. मात्र अतिवृष्टीच्या दिवशी काही रहिवाशांनी कव्हर उघडल्यामुळे त्यात डॉक्टर वाहून गेले. तर यापूर्वीही अनेकदा कव्हर चोरीला जाण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याचा प्रयत्न यानिमित्ताने पालिका प्रशासनाने सुरू केला आहे.

आरएफआयडी टॅग

मॅनहोलच्या कव्हरला आरएफआयडी टॅग लावावा. त्यामुळे हे कव्हर जागेवरून हलवल्यास तत्काळ आपत्कालीन विभागाला तसा मेसेज जाईल किंवा प्रत्येक मॅनहोलच्या खाली जाळी बसवावी म्हणजे कव्हर नसेल तरी माणूस आत पडणार नाही. तसेच पाण्याबरोबर कचरा वाहून जाणार नाही असे एम पश्चिम प्रभागाचे असिस्टंट इंजिनीअर सत्यजीत पाटील यांनी म्हटले आहे.

कव्हरवर गॅस बलून

मॅनहोलच्या कव्हरच्या खाली अशा प्रकारची यंत्रणा असावी की कव्हर फक्त पाच ते सहा इंचच वर उघडले जाईल. कव्हर हलवल्यास आपोआप गॅस बलून हवेत उंच उडतील अशी योजना हवी असे दीपक हेलदूर या मुंबईकराने सांगितले

फक्त दोन नागरिकांकडून प्रतिसाद

पालिका प्रशासनाने वर्तमानपत्रात जाहिरात देऊन मॅनहोलच्या सुरक्षिततेसाठी उपाय सुचवण्याचे आवाहन नागरिकांना आणि संस्थांना केले होते. फेसबुकवर पोस्टच्या पोस्ट पडत असल्या तरी त्याला संपूर्ण मुंबईतून फक्त दोन जणांनी प्रतिसाद दिला आहे. त्यात एक सत्यजीत पाटील हे पालिकेचे असिस्टंट इंजिनीअर आहेत तर दुसरे दीपक हेदूलकर आहेत.

बिजागरासहित कव्हर

दरम्यान, कव्हरच्या खाली जाळी बसवण्याच्या पर्यायावर पालिका प्रशासन विचार करीत आहे. त्याचबरोबर बिजागर असणारे कव्हर बसवण्याचाही पर्याय तपासून पाहिला जात आहे.

सोशल मीडियावरील पर्याय

मॅनहोलवर जाळीदार कव्हर बसवा अशी सूचना जतीन खांडवाला यांनी केली आहे. मात्र त्यावरून गाडय़ा गेल्यास त्याचे वजन पेलवेल का याचा विचार केला जाणार आहे.