नातेसंबंध टिकवण्यासाठी काय कराल?

सामना ऑनलाईन । मुंबई

प्रत्येक नातं हे विश्वासावर टिकतं. यामुळे नातेसंबंध सांभाळताना विश्वासार्हता जपणं अत्यंत गरजेचं आहे. मात्र बऱ्याचवेळा क्षुल्लक गैरसमजामुळे दृढ नात्यांमध्येही दुरावा येतो. पण वेळीच हा गैरसमज दूर केला नाही तर मात्र अनर्थ निर्माण होऊन नातेसंबंध कायमचे तुटण्याची शक्यता असते. म्हणूनच असे अप्रिय प्रसंग टाळण्यासाठी काय करायच याबद्दल जाणून घेऊया.

love-yourself

स्वतःवर प्रेम करा
दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडण्याआधी सर्वप्रथम स्वतःवर प्रेम करायला शिका. कारण ज्या व्यक्ती स्वतःवर प्रेम करतात त्याच व्यक्तींना प्रेमाचं महत्त्व समजतं. अशाच व्यक्ती दुसऱ्यांवरही भरभरून प्रेम करू शकतात. आत्मविश्वास निर्माण होतो. ज्यामुळे आयुष्यात येणाऱ्या संकटांचा सामना करण्याची ताकद वाढते. दुसऱ्याला समजून घेण्याचं शहाणपण नकळत येतं, जे नातेसंबंध टिकवण्यासाठी आवश्यक आहे.

trust

जोडीदारावर विश्वास ठेवा
जिवंत राहण्यासाठी ज्याप्रमाणे श्वास घेणं गरजेच आहे, तसंच नात टिकण्यासाठी परस्परांवर विश्वास ठेवणंही आवश्यक आहे. कुठल्याही नात्याचा पाया हा विश्वासावरच उभा असतो. यामुळे मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्याबद्दल मनात कुठलीही शंका-कुशंका असेल तर ती काढून टाका. समोरच्या व्यक्तीबरोबर मोकळेपणाने बोला. त्याचे जवळचे मित्र बना. अडचणी सोडवण्यात त्याला मदत करा. संपूर्ण बाजू ऐकून घेतल्याशिवाय प्रतिक्रिया देऊ नका.

loyal

प्रामाणिकपणा
आपल्या मित्र किंवा जोडीदाराबरोबर कधीही खोटं बोलू नका. कारण एक खोटं लपवण्यासाठी भविष्यात कदाचित तुम्हांला अजून शंभर वेळा खोटं बोलावं लागेल. यामुळे तुमच्या प्रामाणिकपणावर शंका व्यक्त केल्या जातील, ज्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो.

communication

संवाद
नातेसंबंधामध्ये संवाद फार महत्त्वाचा आहे. जिथे संवाद खुंटतो तिथे सगळंच संपतं. यामुळे फार दिवस कोणाशीही अबोला ठेवू नका. समोरचा केव्हा बोलेल याची वाट न बघता तुम्हीच बोलण्यास सुरुवात करा. अहंपणा दूर ठेवा.