शिवसेनेच्या महारक्तदान शिबिरात ३८२४ बाटल्या रक्तसंकलन

सामना प्रतिनिधी, मुंबई

शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्रमांक ११ च्या वतीने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामधून तब्बल ३८२४ बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले.लालबागच्या साईबाबा पथ महापालिका शाळेत झालेल्या या महारक्तदान शिबिरात विभागातील १७ शिवसेना शाखांनी सहभाग घेतला होता.

विभागप्रमुख आशीष चेंबुरकर आणि विभाग संघटक किशोरी पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना उपनेते, खासदार अरविंद सावंत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, विभागप्रमुख, आमदार ऍड. अनिल परब, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर, आमदार अजय चौधरी, सुनील शिंदे, माजी खासदार मोहन रावले, माजी आमदार दगडू सकपाळ, माजी महापौर महादेव देवळेकर, श्रद्धा जाधव, स्नेहल आंबेकर आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी उपविभागप्रमुख गजानन चव्हाण, हरीश वरळीकर, राम साळगांवकर, विजय कामतेकर, पराग चव्हाण, विधानसभा संघटक राम सावंत, सुधीर साळवी आदींनी मेहनत घेतली.