पाचजणींची भन्नाट कॉमेडी, हम पांच!

क्षितिज झारापकर । मुंबई

कलाकाराचा एक वकूब असतो. मराठी रंगभूमीवर काही निर्मिती संस्थादेखील आपापला वकूब राखून नाटकं करतात. दत्तविजय प्रॉडक्शन्स ही अशीच एक संस्था. गेल्या शतकाच्या नव्वदीच्या दशकाअंती ‘यदाकदाचित’ या तुफान यशस्वी नाटय़निर्मितीने रसिकांच्या मनात पोहोचलेली ही संस्था. ‘यदाकदाचित’ हे नाटक खरं तर संतोष पवार यांच्या एकांकिकेतून जन्माला आलेलं. त्या काळी संतोष पवार हा महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांचा बादशहा होता. दत्तविजयने त्याची एकांकिका व्यावसायिक नाटक म्हणून रंगभूमीवर आणली आणि दत्ता घोसाळकर व त्यांचे बंधू अरविंद घोसाळकर यांनी मराठीत नवनिर्मात्यांच्या एन्ट्रीचा पायंडा रचला. आज जवळ जवळ वीस वर्षांचा इतिहास या संस्थेचा आहे आणि या इतिहासात एकाहून एक हिट नाटकं आहेत. हा इतिहास इथे उगाळण्याचं कारण म्हणजे दत्तविजय प्रॉडक्शन्सने पुन्हा एकदा एका कौतुकपात्र एकांकिकांचं व्यावसायिकात रूपांतर करून एक नवीन धम्माल विनोदी नाटक मराठी रंगभूमीवर सादर केलंय. दत्तविजय प्रॉडक्शन्स, रंगसंयोग अणि मार्केटेड बाय प्रेस्टिज एन्टरटेन्मेन्टचं ‘हम पांच’ हे ते नाटक.

पाच तिखट बायकांची एक गोड कॉमेडी अशी कॅप्शन असणाऱया ‘हम पांच’ या नाटकाचा लेखक अणि दिग्दर्शक आहे संकेत विजय तांडेल. मूळ संकल्पना रवी मिश्रा यांची आहे. संकेत तांडेल याने लेखक म्हणून हे नाटक लिहिताना प्रेक्षक सतत हसत राहतील ही खबरदारी घेतलीय. बहुधा एकांकिकांचा रिस्पॉन्स पाहून पूर्ण नाटक लिहिताना त्याने त्यातला प्रासंगिक विनोद हा स्ट्रॉन्ग पॉइंट कायम ठेवण्याचा विचार केलेला आहे. ‘हम पांच’ आपल्याला सुरुवातीपासूनच हसायला भाग पाडतं. नाटक गाण्याने सुरू होतं, ज्यात पाच बायका हातात वेगवेगळ्या झाडू घेऊन नाचतात. नाटकाची पठडी इथेच सेट होते. गाणंही संकेत तांडेल यानेच लिहिलं आहे. या पाच बायका नेमक्या कोण आहेत हे आपल्याला तेव्हा माहीत नसतं. गाण्यानंतर याचा खुलासा होतो. मुळात एका गृहसंकुलातील विविध घरांमध्ये काम करणाऱया या पाच मोलकरणी आहेत. ‘हम पांच’ ही त्यांची कहाणी आहे.

मुळात संकेत तांडेलचा हा थॉटचं टेरिक आहे. त्यात त्याने लेखक म्हणून प्रत्येकीचं कॅरेक्टर हे वेगळं उभं केलंय. इथे लेखक म्हणून तो जिंकतो. पाचातली प्रत्येक जण जात, प्रांत भाषा आणि मानसिकता या सगळ्य़ा निकषांवर वेगवेगळी आहे. हा ‘हम पांच’चा प्लस पॉइंट आहे. त्यात कुसुम भाभी हा मास्टर स्ट्रोक आहे. नाटकात संकेत तांडेल वेगवेगळे गंभीर विषय आणतोदेखील, पण त्यांचे गांभीर्य नाटकाच्या पठडीला कुठेही खीळ घालत नाही आणि विनोदाचा स्रोत अखंडित सुरू राहतो. संकेत तांडेलने ‘हम पांच’चं दिग्दर्शन अगदी सहज आणि सोपं ठेवलं आहे. लेखनातून नैसर्गिकरीत्या जे अभिप्रेत आहे तसंच त्याने हे नाटक बसवलंय. त्यामुळे कशाचाही ऊहापोह वाटत नाही. सगळी पात्रं नीटनेटकी उभी राहतात आणि मनोरंजनाचं कार्य तडीस नेतात.

‘हम पांच’च्या पठडीतल्या नाटकांना टायमिंग असणारे कलाकार गरजेचे असतात. प्रासंगिक विनोदासाठी हे लागतं. इथे विनोदाची पंचलाइन डिलिव्हर करणाऱयापेक्षा त्यावर रिऍक्ट होणारे महत्त्वाचे असतात. विनोद त्या रिऍक्शनमधून तयार होतो. एक उदाहरण देतो. ‘टूरटूर’ या नाटकात लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी अणि विजय कदम होतेच, पण त्यातील चेतन दळवी, प्रदीप पटर्वधन, सतीश सलागरे, प्रशांत दामले, दीपक शिवाय हे पुढे स्वतः स्टार झाले ते त्यातला प्रत्येक जण हा उत्तम रिऍक्टर होता म्हणून. ‘हम पांच’ मधले कलाकार हेसुद्धा चांगले रिऍक्टर आहेत. पाचही जणी एकमेकींच्या पंचलाइन्सवर उत्तम रिऍक्ट होतात. मुळात लेखक अणि दिग्दर्शकाने हे काम सोपं केलंय. प्रत्येकीचं कॅरेक्टर एका विशिष्ट पोताचं असल्याने रिऍक्शन काय द्यायची हे ठरवणं सोपं झालंय.

नाटक घडतं ते माधुरीच्या घरात. म्हणजे माधुरी जिथे काम करते त्यांच्या घरात. आपापल्या मालकिणी जशा किटी पाटर्य़ा करतात तशी आपण एकदा करावी यातून ‘हम पांच’ हे नाटक उभं राहतं. माधुरी झालेल्या रमा रानडे हिने एका अतिउच्चभ्रू घरातील मेड सर्व्हन्ट खूप छान उभी केली आहे. सुरुवातीपासूनच माधुरी ही तिच्या इतर कामवाल्या मैत्रिणींपेक्षा थोडी वेगळी आहे हे रमा रानडेने अगदी सहजपणे दाखवलंय. येणाऱयांपैकी शांताच्या भूमिकेत प्रियांका हांडे ही आपला आगरी बाणा ठासून उभा करते. प्रियांकाने भाषेची गंमत नाटकभर फॅण्टॅस्टिक जपलीय. पूर्वा कौशिकने कल्याणीचा भाबडेपणा खूप सुंदर साकारलाय. एका ड्रीम सिक्वेन्समध्ये थोडीशी दारू पिऊन आपल्याला हवा असणारा पुरुष म्हणून तिच्या समोर तिचाच दारूडा नवरा येतो तेव्हा हा भाबडेपणा प्रकर्षाने जाणवतो.

मंजिरी ही या पाचजणींमधली जरा पोक्त व्यक्तिरेखा. नेहा पाटील हिने ती खूप समंजसपणे वठवलीय. पाचही जणींच्या अंतर्मनाचा उलगडा ‘हम पांच’मध्ये मंजिरीपासून सुरू होतो, पण ‘हम पांच’मध्ये कमाल करते ती वनिता खरात. कुसुम या उत्तर हिंदुस्थानी भाभीच्या पात्रातून. वनिताने पंचलाइन फेकण्याची अणि इतरांच्या विनोदावर रिऍक्ट होण्याची घाई तर दाखवली आहेच, पण देहबोलीतून विनोद निर्मितीही तिने अचूक साधली आहे. बनिबॅगच्या उतारावर बसून सारखं घसरत राहण्याची तिची कसरत चोख हशा मिळवून जाते. या पाचजणींव्यतिरिक्त एक आगंतुक कलाकार ‘हम पांच’मध्ये आहे वैभव पिसाट. अनेक पात्र रंगवत वैभवने नाटक खेळतं ठेवलंय. शिवाय वैभव पिसाटने ‘हम पांच’चं नेपथ्य व संगीत याचीही जबाबदारी सार्थपणे उचललेली आहे. एकंदरीत दत्तविजय प्रॉडक्शन्सने पुन्हा एकदा एक तद्दन कमर्शियल आणि भट्टी जमलेली कॉमेडी यंदाच्या हंगामात बाजारात आणली आहे.

दर्जा : अडीच स्टार
निर्मिती : श्री दत्तविजय प्रॉडक्शन्स रंगसंयोग
निर्माते : यतीनभाऊ मोरे, अरविंद घोसाळकर
प्रस्तुती : सुनील पुजारी
मूळ संकल्पन : रवी मिश्रा
नेपथ्य, प्रकाश : वैभव पिसाट
संगीत : सुशील कांबळे
लेखक, दिग्दर्शक, गीतकार : संकेत तांडेल
कलाकार : रमा रानडे, नेहा पाटील, पूर्वा कौशिक, प्रियांका हांडे, वनिता खरात, वैभव पिसाट