तीन अतिसंवेदनशील जेलमध्ये बसवणार ‘ह्युमन बॉडी स्कॅनर’

>> राजेश चुरी

न्यायालयातून सुनावणीनंतर जेलमध्ये परत आलेल्या कैद्याकडे सापडले चरस…, कैद्याकडे सापडला मोबाईल…, कैद्याकडे सापडले शस्त्र…, हल्लीच्या काळात अशा प्रकारच्या बातम्या वाचायला येतात. कारण वेगवेगळय़ा क्लृप्त्या लढवून कैदी जेलमध्ये चरस-चाकूसारख्या वस्तू नेतात. त्यातून जेलमध्ये अनेक गैरप्रकार होतात. या सर्वाला आळा घालण्यासाठी आता राज्यातील तीन अतिसंवेदनशील कारागृहांमध्ये अत्याधुनिक ‘ह्युमन बॉडी स्कॅनर’ बसवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाने घेतला आहे. राज्यात प्रथमच असा प्रयोग राबवण्यात येत आहे.

कोर्टातील सुनावणीनंतर परत येताना अनेकदा कैदी अंगात लपवून चरस, गांजा, मोबाईल, धारदार शस्त्र जेलमध्ये आणतात. कोर्टातून किंवा रुग्णालयातील वैद्यकीय चाचणी करून जेलमध्ये परत येताना कैद्याची अंगझडती घेतली जाते. नोकरभरतीअभावी जेलमधील सुरक्षा रक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. कामाच्या बोजामुळे अनेकदा कैद्याची अंगझडती घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही किंवा जेल कर्मचारी आणि कैद्याच्या हातमिळवणीमुळे अशा वस्तू सहजपणे जेलमध्ये नेता येतात. त्यातून जेलमध्ये सुरक्षा व्यवस्था धोक्यात येते. त्यामुळे आता तीन अतिसंवेदनशील जेलमध्ये जेलमध्ये ‘एक्स रे’वर आधारित ‘फूल ह्युमन बॉडी स्कॅनर’ बसवण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. या यंत्रणेसाठी 9 कोटी 12 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.

जेलमध्ये सीसीटीव्ही
जेलच्या सुरक्षा व्यवस्थेच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एक जनहित याचिकेवरील सुनावणीनंतर राज्यातील सर्व कारागृहांत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यावर भर दिला आहे. जेलमधील सुरक्षा व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची महत्त्वाकांक्षी योजना मार्गी लावण्यासाठी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी पावले उचलली आहेत. सीसीटीव्ही योजनेवर 14 कोटी 44 लाख 71 हजार 276 रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे कैद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे सोपे जाणार आहे.

या तीन जेलमध्ये बसणार फूल बॉडी स्कॅनर
– आर्थर रोड कारागृह
– तळोजा जेल कारागृह
– येरवडा कारागृह