मांत्रिकाचे औषध पाजून महिलेची हत्या, नरबळी असल्याचा संशय

सामना ऑनलाईन, सांगली

सांगलीमध्ये एका महिलेची हत्या करण्यात आली असून हा नरबळी असल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे. या महिलेला विषारी औषध पाजून ठार मारण्यात आलं. हे औषध कर्नाटकातील एका मांत्रिकाकडून आणण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. पूजा पवार असं या महिलेचं नाव असून तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

पूजा गेले काही दिवस रुग्णालयात होती. ती बरी व्हावी यासाठी तिच्या माहेरच्यांनी लाखो रूपये खर्च केले, मात्र तिचा मृत्यू झाला. माहेरच्यांनी केलेल्या तक्रारीनंतर पूजाचे पती आबासाहेब पवार, सासू रुक्मिणी, सासरे दादू पवार आणि अक्काताई वंजारी यांना अटक करण्यात आली होती मात्र त्यांना जामीन मिळाल्याने ते मोकळे फिरतायत. हे जामीन रद्द करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांनी केली आहे. पूजा यांची लहान मुलगी असून तिचा सांभाळ करण्यासाठी राज्य शासनाने मनोधैर्य योजनेतून मदत करावी अशी मागणीही देशपांडे यांनी केली आहे.