पर्यावरण बचावासाठीचे आमरण उपोषण तिसऱ्या दिवशी सुरूच

सामना प्रतिनिधी । उरण

विकासाच्या नावाखाली उरण तालुक्यात विविध प्रकारे होत असलेल्या प्रदुषणाच्या विरोधात बेलपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते अजित म्हात्रे यांनी दिनांक १२ पासून सुरू केलेले आमरण उपोषण आज तिसऱ्या दिवशीही सरूच आहे. त्यांच्या या उपोषणाची दखल अद्यापही शासकीय पातळीवर घेतली जात नसल्याने येथे आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, आज तिसऱ्या दिवशी अजित म्हात्रे यांची तब्ब्येत काहीशी खालावली होती. मात्र जोपर्यंत तालुक्यातील होणाऱ्या प्रदूषणाबाबत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे अजित म्हात्रे यांनी सांगितले.

माती दगड, दगडाची पावडर या माध्यमातून होणारे हवेतील प्रदूषण, इंधन माध्यमातून, विषारी कार्गोपासून हवेत होणारे प्रदूषण, विविध कंपन्या, कारखाने यातून नदी समुद्रात सोडण्यात येणारे केमिकल मिश्रीत दूषित पाणी, ध्वनी माध्यमातून होणारे प्रदूषण, विविध झाडे वृक्ष – वेली, कांदळवन आदी नदी नाले डोंगर यासारखी नैसर्गिक साधनसंपत्ति नष्ट करणाऱ्या प्रदूषण समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून या समस्यांबाबत शासन दरबारी पत्रव्यवहार करुन सुद्धा समस्या सुटत नसल्याने उरण पनवेल तालुका पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अजित कृष्णा म्हात्रे सोमवार पासून हुतात्मा चौक, दास्तान फाटा येथे आमरण उपोषणाला बसले आहेत.

या उपोषणाला उरण तालुक्यातील नागरीकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. आमदार मनोहर भोईर, कामगार नेते श्याम म्हात्रे, महेंद्र घरत, माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार कांतीलाल कडू, सामाजिक कार्यकर्ते मनोहर म्हात्रे, काँग्रेसचे कार्यकर्ते पंडितशेठ घरत आदीनी उपस्थित राहून पाठींबा दर्शविला. तर पर्यांवरणासारख्या गंभीर प्रश्नाबाबत छेडलेल्या उपोषणाकडे उरणच्या तहसिलदार कल्पना गोडे यांनी दुर्लक्ष केले असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पत्रकार कांतिलाल कडू यांनी केली आहे.